ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीच्या लेकींची शैक्षणिक भरारी

आचल चव्हाण ‘NET’ तर आयुषा उराडे MBBSसाठी पात्र! ; ग्रामीण भागातून उच्च शिक्षणाची प्रेरणादायी वाटचाल ; दोन्ही गुणवंत कन्यांचे सर्वत्र कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील दोन गुणवंत कन्यांनी आपल्या शैक्षणिक यशाने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. गोंडपिपरी येथील आचल चव्हाण हिने NET परीक्षा उत्तीर्ण करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तर पंचशील प्रभागातील दामुभाऊ ऊर्फ शाम उराडे यांची कन्या आयुषा उराडे हिची एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे निवड झाली आहे. या दोन्ही यशामुळे गोंडपिपरी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गुणवंत लेकींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आचल चव्हाण हिने प्रतिकूल परिस्थितीत सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली. तिच्या शैक्षणिक प्रवासात दहावीचे शिक्षण जनता विद्यालयातून, बारावीचे शिक्षण हिस्लॉप ज्युनियर कॉलेज, चंद्रपूर येथून, त्यानंतर बी.ए., बी.एड.चे शिक्षण नागपूर येथील कॉलेजमधून आणि एम.ए. इंग्रजीचे शिक्षण पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर तिने NET परीक्षेत यश मिळवत आपल्या मेहनतीचे चीज केले.

दरम्यान, आयुषा उराडे हिनेही वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचे स्वप्न साकार केले आहे. दहावीचे शिक्षण जनता विद्यालयातून, बारावीचे शिक्षण हिस्लॉप ज्युनियर कॉलेज, चंद्रपूर येथून घेतल्यानंतर बी.ए., बी.एड. तसेच एम.ए. इंग्रजीचे शिक्षण पूर्ण केले आहे. आता तिची एम.बी.बी.एस. साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.

आचल आणि आयुषा यांच्या यशातून ग्रामीण भागातील मुलींमध्येही उच्च शिक्षणाची जिद्द, क्षमता आणि मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद आहे, हे अधोरेखित झाले आहे. परिस्थिती कोणतीही असो, सातत्याने प्रयत्न, योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर ध्येय गाठता येते, याचा आदर्श त्यांच्या शैक्षणिक वाटचालीने निर्माण केला आहे.

दोन्ही गुणवंत कन्यांच्या यशाबद्दल पालक, शिक्षक, मित्रपरिवार तसेच गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आचल चव्हाणच्या NET यशाने शिक्षण क्षेत्रात तर आयुषा उराडेच्या MBBS निवडीने वैद्यकीय क्षेत्रात गोंडपिपरीचे नाव उज्ज्वल झाले असून, त्यांच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये