अपहरण नाट्याचा अखेर सुखरूप शेवट! तेलंगणा एलसीबीने ताब्यात घेतलेल्या सराफा व्यापाऱ्याला रात्रीच नातेवाईकांच्या स्वाधीन
देऊळगाव राजातून भरदिवसा इनोव्हातून नेले; साखरखेर्ड्यात पोलिसांनी कार अडवताच उघड झाले तेलंगणा पोलिसांचे कनेक्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : भरदिवसा दुय्यम निबंधक कार्यालयासमोरून एका सराफा व्यापाऱ्याला चार ते पाच जणांनी जबरदस्तीने इनोव्हा कारमध्ये बसवून नेल्याची घटना सोमवारी (२ नोव्हेंबर) घडली आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. ‘आम्ही एलसीबी पोलीस आहोत,’ असे सांगत व्यापाऱ्याला घेऊन जाण्यात आल्याने सुरुवातीला अपहरणाचा संशय निर्माण झाला. नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठल्यानंतर जिल्हाभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली. संशयित इनोव्हा कारचा शोध सुरू असतानाच साखरखेर्डा येथे कार अडविण्यात आली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. संबंधित व्यक्तींचे तेलंगणा राज्यातील निजामाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांशी कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले. सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीतील कथित गैरव्यवहाराच्या तपासासाठी देऊळगाव मही येथील सराफा व्यापारी अनिरुद्ध मधुकर शिंगणे यांना तेलंगणा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, चौकशी व पडताळणीनंतर त्यांची पुढील ताब्यात आवश्यकता नसल्याने त्यांना सोमवारी रात्रीच नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
दुय्यम निबंधक कार्यालयासमोर घडला थरार
देऊळगाव मही येथील अनिरुद्ध मधुकर शिंगणे (वय ३२) हे सराफा व्यावसायिक असून त्यांचे सोने-चांदीचे दुकान आहे. यासोबतच ते जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायातही सक्रिय आहेत. सोमवारी एका जमिनीच्या व्यवहारासाठी ते देऊळगाव राजा येथे आले होते. दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयात त्यांचे काम सुरू असतानाच चार ते पाच जण तेथे आले. त्यांनी आपण एलसीबी पोलीस असल्याचे सांगत अनिरुद्ध शिंगणे यांना इनोव्हा कारमध्ये बसवून सोबत नेले.
भरदिवसा कार्यालयासमोर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. काही वेळातच व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची बातमी शहरात पसरली. नातेवाईकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
साखरखेर्ड्यात इनोव्हा अडवली अन् उलगडा झाला!
व्यापाऱ्याला घेऊन जाणाऱ्या इनोव्हा कारचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जिल्हाभरात हालचाली सुरू केल्या. संशयित वाहन साखरखेर्डा परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कार अडवून चौकशी केली. यावेळी संबंधित व्यक्ती तेलंगणा राज्यातील निजामाबाद पोलीस आयुक्तालयाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे समोर आले.
तेलंगणातील निजामाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत सीसीएसचे पोलीस निरीक्षक अजय यांच्या पथकाने अनिरुद्ध शिंगणे यांना नविपेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले. नविपेट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३१ (३) आणि ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचा उल्लेख नातेवाईकांच्या हमीपत्रात करण्यात आला आहे.
रात्री ११ वाजता नातेवाईकांच्या स्वाधीन
या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे, तेलंगणा पोलिसांनी अनिरुद्ध शिंगणे यांची चौकशी आणि पडताळणी केल्यानंतर त्यांच्या पुढील ताब्याची आवश्यकता नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
यासंदर्भात अनिरुद्ध शिंगणे यांचे मामा उद्धव चेके (वय ४२) आणि सासरे मनोहर चेके (वय ५१), दोघेही रा. देऊळगाव राजा यांनी हमीपत्र व स्वीकृतीपत्र दिले आहे. या पत्रानुसार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजता मालेगाव, महाराष्ट्र येथे अनिरुद्ध शिंगणे यांना सुखरूप व चांगल्या प्रकृतीत नातेवाईकांनी ताब्यात घेतले.
तपासासाठी बोलावल्यास उपस्थित करण्याची हमी
तेलंगणा पोलिसांच्या तपासासंदर्भात तपास अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा न्यायालयाने जेव्हा जेव्हा उपस्थित राहण्यास सांगितले, तेव्हा अनिरुद्ध शिंगणे यांना हजर करू, अशी लेखी हमी त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. कोणत्याही दबाव, प्रलोभन, धमकी अथवा सक्तीशिवाय स्वखुशीने हे हमीपत्र दिल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
भरदिवसा सराफा व्यापाऱ्याला इनोव्हातून घेऊन जाण्याच्या प्रकारामुळे अपहरणाचा संशय निर्माण झाला होता. मात्र, साखरखेर्ड्यात वाहन अडविल्यानंतर तेलंगणा पोलिसांच्या तपासाची बाब समोर आली आणि रात्री उशिरा व्यापाऱ्याला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे दिवसभर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणाचा तूर्तास सुखरूप शेवट झाला आहे..



