ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती तस्करांवर महसूल-पोलिसांचा मध्यरात्री सर्जिकल स्ट्राइक ; एकाच कारवाईत नऊ टिप्पर जप्त!

परिविक्षाधीन तहसीलदार प्रमोद खमाट यांच्या पथकाची धडक कारवाई ; मंडपगाव शिवारात तब्बल १६ तास धडक मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात देऊळगाव राजा महसूल प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. अवैध रेती वाहतुकीसाठी एकत्र जमलेल्या रेती तस्करांवर महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री धडक कारवाई करीत तब्बल नऊ टिप्पर जप्त केले. २ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजता सुरू झालेली ही कारवाई ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत सुरू होती. तब्बल १६ तास चाललेल्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. परिविक्षाधीन तहसीलदार प्रमोद खमाट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

मंडपगाव शिवारात मध्यरात्री धाड

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा तालुक्यातील जुने मंडपगाव शिवारात अवैध रेती वाहतुकीसाठी टिप्पर एकत्र जमल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे परिविक्षाधीन तहसीलदार प्रमोद खमाट यांनी महसूल विभागाचे पथक तयार करून पोलीस प्रशासनाच्या मदतीने संयुक्त कारवाईचे नियोजन केले. २ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता पथकाने मंडपगाव शिवारात धडक दिली. यावेळी अवैध रेती वाहतुकीच्या संशयावरून एकूण नऊ टिप्पर ताब्यात घेण्यात आले.

१६ तास चालली धडक मोहीम; नऊ टिप्पर पोलीस ठाण्यात

रात्रीच्या अंधारात सुरू झालेली ही कारवाई दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत सुरू होती. जप्त करण्यात आलेले नऊ टिप्पर देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीच्या व्यवसायात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. महसूल प्रशासनाने अचानक केलेल्या या कारवाईची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

देऊळगाव राजा येथील तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन तहसीलदार प्रमोद खमाट यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. या कारवाईला देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी आणि पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महसूल आणि पोलीस प्रशासनाने समन्वय साधून ही संयुक्त मोहीम यशस्वी केली.

महसूल कर्मचाऱ्यांचा पथकात सहभाग

या धडक कारवाईत महसूल विभागाचे मंडळ अधिकारी पी. टी. जायभाये, विजय हिरवे, तलाठी सुमित जाधव, संजय हांडे, शिपाई पंजाबराव ताठे, महसूल सेवक रामेश्वर शेरे आणि चालक म्हस्के यांनी सहभाग घेतला. पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे एकाच कारवाईत नऊ टिप्पर ताब्यात घेण्यात प्रशासनाला यश आले.

नऊ टिप्पर जप्त; वाहन क्रमांकांची नोंद

या कारवाईत महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने एकूण नऊ टिप्पर ताब्यात घेतले. त्यामध्ये एमएच-२८-बीबी-७८६४, एमएच-२८-बीबी-७४८९, एमएच-२१-बीएम-८८३२, एमएच-२९-बीएक्स-१८९९, एमएच-२८-बीझेड-९४९४, एमएच-३७-जे-१६२३, एमएच-२८-बीबी-०१७८ आणि एमएच-२८-बीबी-७२९८ या क्रमांकांच्या टिप्परचा समावेश आहे.तसेच एक विना क्रमांकाच्या टिप्परचाही समावेश आहे. जप्त करण्यात आलेली सर्व वाहने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.

अवैध रेती वाहतूकदारांना प्रशासनाचा इशारा!

रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतूक यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असून पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. मंडपगाव शिवारातील या कारवाईने अवैध रेती वाहतूकदारांना स्पष्ट संदेश दिला असून, यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार का, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये