आळंद फाट्यावर भरधाव वाहनाचा धुमाकूळ; उभ्या कारला जोरदार धडक, मोठे नुकसान!
देऊळगाव राजा-चिखली मार्गावर मध्यरात्री अपघात; निष्काळजी वाहनचालकावर गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : शहरातील चिखली रोडवरील आळंद फाट्याजवळ भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे अपघात घडल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला समोरून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान गबाजी मांटे (वय ४५, रा. सावंगी टेकाळे, ता. देऊळगाव राजा) यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्याकडील एमएच-२८-एझेड-९२९५ क्रमांकाची कार आळंद फाट्याजवळ उभी होती. याचवेळी एमएच-२०-बीसी-४०८ क्रमांकाचे वाहन घेऊन सयद सलमान सयद नुरा (रा. देऊळगाव मही) हा चालक त्या ठिकाणी आला.
आरोपी चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून मांटे यांच्या उभ्या असलेल्या कारला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक घडलेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली.
या घटनेनंतर भगवान मांटे यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४.२१ वाजता कायम अपघात क्रमांक ४९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१ व ३२४ (४) नुसार सयद सलमान सयद नुरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत. वाहनचालकांच्या भरधाव वेगामुळे आणि निष्काळजीपणामुळे अशा अपघातांचा धोका वाढत असून, वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून सावधगिरीने वाहन चालविण्याची गरज आहे..



