ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरीकरांवर अन्यायकारक करवाढ लादू नका!

पाणीपट्टीतील ४०० रुपयांची वाढ व गृहकरातील दिवाबत्ती कर तात्काळ रद्द करा – भाजपची मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :_ नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांवर लादण्यात आलेली अन्यायकारक पाणीपट्टी व गृहकरातील करवाढ तात्काळ स्थगित करून रद्द करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ब्रम्हपुरी शहर अध्यक्ष प्रा. डॉ. सुयोग वा. बाळबुधे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.ब्रम्हपुरी नगरपरिषदेने वार्षिक पाणीपट्टीमध्ये थेट ४०० रुपयांची वाढ करून पूर्वीची १,४०० रुपये असलेली पाणीपट्टी १,८०० रुपये केली आहे. तसेच गृहकरामध्ये नव्याने दिवाबत्ती कराची आकारणी सुरू करून नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकण्यात आला आहे.सध्या ब्रम्हपुरी परिसरातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सर्वसामान्य नागरिक दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या महागाईमुळे आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत नगरपरिषदेने केलेली ही करवाढ म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ ठरणारी आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याऐवजी त्यांच्यावर अतिरिक्त करांचा बोजा लादणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

या निवेदनातून पाणीपट्टीतील ४०० रुपयांची वाढ तात्काळ रद्द करणे, गृहकरातील दिवाबत्ती कर रद्द करणे, संपूर्ण करवाढीची शासन स्तरावर चौकशी करणे आणि नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.शासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन नागरिकांना न्याय द्यावा. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने ब्रम्हपुरी शहरातील नागरिकांना सोबत घेऊन नगरपरिषद प्रशासना विरोधात तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही डॉ. सुयोग वा. बाळबुधे यांनी दिला आहे.सदर निवेदन देताना ब्रम्हपुरी शहराचे महामंत्री तथा नगरसेवक मनोज भूपाल, महामंत्री पवन जयसवाल, स्वप्नील अलगदेवे, उपाध्यक्ष प्रशांत वसाके,रेहमानखान पठाण,दत्ता येरावार,युवा मोर्चा अध्यक्ष अमित रोकडे,महामंत्री पंकज माकोडे, उपाध्यक्ष अक्षय झुरमुरे, भरत सावकार,सचिव कृष्णा मेहेर,विपुल मेश्राम, विवेक गरफडे,पुरुषोत्तम शडमाके उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये