ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेश विसर्जन व्यवस्थेचा महापौरांकडून आढावा

नागरिकांच्या सुविधांना सर्वोच्च प्राधान्य; विसर्जनस्थळी आवश्यक व्यवस्था पूर्ण ठेवण्याच्या सूचना

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ दिनांक 25 सप्टेंबर ला अनंत चतुर्दशी निमीत्य गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन व्यवस्था सुरळीत, सुरक्षित आणि स्वच्छ राहावी, यासाठी महापौर सौ. संगीता राजेंद्र खांडेकर यांनी शहरातील विविध गणेश विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला.

महापौरांनी रामसेतू लगतचे कृत्रिम गणेश विसर्जन कुंड, संजय गांधी मार्केट परिसर, रामाळा तलाव, बाबुपेठ तसेच शहरातील इतर ठिकाणी कृत्रिम तलावाला येथे भेट देऊन तेथील विसर्जन व्यवस्था, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता तसेच निर्माल्य संकलनाची व्यवस्था यांची पाहणी केली. यावेळी विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशांचीही पाहणी करण्यात आली.

गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी विसर्जनस्थळी आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. तसेच विसर्जनाच्या दिवशी गर्दीचे योग्य नियोजन, स्वच्छता व्यवस्था, प्रकाश व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

“गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. गणेशभक्तांना विसर्जनाच्या वेळी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण ठेवावी. नागरिकांनीही पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करून महानगरपालिकेच्या स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना सहकार्य करावे,” असे आवाहन महापौर संगीता राजेंद्र खांडेकर यांनी केले.

महापौरांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जनासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसह स्वच्छ व पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य देण्यात येत आहे.

यावेळी स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे, उपमहापौर प्रशांत दानव, आयुक्त अकुनूरी नरेश, उपायुक्त शेषराव टाले, सहायक आयुक्त श्रीमती क्षितीज जांभुळकर, शहर अभियंता रविंद्र हजारे तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये