पोलीस स्टेशन, सेलु हद्दीतील दारुविक्रेता इसमाची एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, सेलु हद्दीतीत दारुविक्रेता इसम नामे प्रविण उर्फ शर्मा शत्रुघ्न धाबर्डे वय ४८ वर्षे रा. तळोदी ता. सेलु जि. वर्धा याचे विरुध्द पोलीस स्टेशन, सेलुचे अभिलेखावर सन २०१७ पासुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत एकुण २७ गुन्हे नोंद आहे. सन २०१७ पासुन स्थानबध्द इसम नामे प्रविण उर्फ शर्मा शत्रुघ्न धाबर्डे याने पोलीस स्टेशन, सेलु परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवुन सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. प्रविण उर्फ शर्मा शत्रुघ्न धावडे याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन, सेलु अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने व त्याची गुन्हेगारी गतिवीधी थांबत नसल्याने त्याचे विरुध्द कलम ९३ महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९, कलम ५६(१), (अ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये प्रविण उर्फ शर्मा शत्रुघ्न धाबर्डे यास ०६ महीन्याचे कालावधीकरीता वर्धा जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले होते. परंतु अशा प्रतिबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसुन त्यानंतरही सतत गुन्हे करीत होता.
त्या अनुषंगाने सहा. पोलीस निरीक्षक, श्री. पंकज वाघोडे पो.स्टे. सेलु यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, मा. श्रीमती वान्मथी सी. यांचेकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा यांनी दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन प्रविण उर्फ शर्मा शत्रुघ्न धावडे यास छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले होते. स्थानबध्द आदेशांन्वये त्याला छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.
वर्धा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी, तसेच आगामी, गणपती उत्सव, दुर्गा उत्सव, दसरा, दिवाळी याप्रकारचे सण उत्सव शांततेत पार पडावे या उद्देशाने अशाच प्रकारे अवैधरीत्या दारुविक्रेत्यांवर, तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तींवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मथी सी., तसेच मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल, यांनी दिलेले आहे.



