ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

टाटा ट्रस्टचा सहकार्याने होणार गावांचा “शाश्वत विकास..!”

पोंभुर्णा_बल्लारपूर नंतर गोंडपिपरी तालुक्याला संधी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे.

शाश्वत विकास उपक्रमासाठी तालुक्यातील ३० गावांची निवड.

गोंडपिपरी :- ग्रामीण विकासाच्या दृष्टीने पोभूर्णा आणि बल्लारपूर तालुक्यांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात येत असलेल्या टाटा ट्रस्टच्या महत्त्वाकांक्षी विकास उपक्रमात आता गोंडपिपरी तालुक्याचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच टप्प्यात तालुक्यातील ३० गावांची निवड करण्यात आली असून, या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे, शेती अधिक सक्षम करणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे, युवकांना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सेवा, जलसंधारण, पोषण, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ग्रामविकास या क्षेत्रांमध्ये टाटा ट्रस्टकडून व्यापक काम केले जाणार आहे. त्यामुळे निवड झालेल्या गावांच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

निवड करण्यात गावांमध्ये स्थानिक गरजांचा अभ्यास करून विविध विकास प्रकल्प राबविले जाणार असून, ग्रामपंचायती, शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांच्या सहभागातून विकासाची नवी दिशा निश्चित केली जाणार आहे.गोंडपिपरी तालुक्याचा या उपक्रमात समावेश झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, ही केवळ ३० गावांची निवड नसून संपूर्ण तालुक्याच्या विकासाचा पाया रचणारा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची नवी चळवळ उभी राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात ३० गावांची निवड झाली असली तरी पुढील टप्प्यांमध्ये गोंडपिपरी तालुक्यातील उर्वरित गावांचाही या उपक्रमात समावेश व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.टाटा ट्रस्टच्या माध्यमातून गोंडपिपरी तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला असून, या संधीचे लोकसहभागातून विकासाच्या यशोगाथेत रूपांतर करण्याची जबाबदारी आता ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर असणार आहे.

तालुक्यातील या गावांची निवड
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी, वडकुली, चेक वडकुली, टेकोडा, फुरडी हेटी, भनार हेटी, सालेझरी, चेक पारगाव, किरमिरी, नवेगाव, चेक तोहोगाव, पाचगाव, वामनपल्ली, पारडी, वेजगाव, आर्वी, परसोडी, कुडेसावली, कन्हाळगाव, गणपूर, गोजोली मक्ता, चेक गोजोली, चेक दुबारपेठ, चिवंडा, सोमणपल्ली, डोंगरगाव मक्ता, चेक डोंगरगाव आणि उंदीरगाव या गावांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला असून, या गावांच्या शाश्वत विकासावर भर देण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये