ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावरी येथे वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

वाघ-बिबट्याचा बंदोबस्ताची ग्रामस्थांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती तालुक्यातील मौजा सावरी गाव परिसरात वाघ, बिबट्या, अस्वल यांसह विविध वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी सावरी येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सावरी गाव जंगलालगत असल्याने परिसरात वन्यप्राण्यांचा नियमित वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेकदा वाघ व बिबट्यांकडून बकऱ्या, कोंबड्या तसेच कुत्रे घराच्या दारातून उचलून नेल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे.

दि. १६ सप्टेंबर रोजी शेतात काम सुरू असताना प्रफुल्ल विश्वनाथ दडमल यांच्या बैलावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेनंतर शेतात काम करणाऱ्या महिला व पुरुष शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शेतीची दैनंदिन कामे करतानाही जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ आली आहे.

वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतीची कामे प्रभावित होत असल्याने ग्रामस्थांनी वनविभागाकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गावाच्या सभोवताल संरक्षक जाळी उभारावी, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरांचा मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई आठ दिवसांच्या आत द्यावी, तसेच वन्यप्राण्यांना गाव व शेतशिवारापासून दूर ठेवण्यासाठी नियमित दवंडी देणे आणि फटाके फोडण्याची उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

वनविभागाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा ग्रामस्थांमध्ये आणखी भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकरी व ग्रामस्थांना सुरक्षितता प्रदान करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये