महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :- महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्याचा, साहित्यिक योगदानाचा तसेच सामाजिक समता, बंधुता आणि वंचित समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. मनोहर बांद्रे यांनी केले. कार्यक्रमास डॉ. अजय कुमार शर्मा, श्री. पवन चटारे, डॉ. रामकृष्ण पटले, डॉ. संदीप घोडीले, डॉ. उत्कर्ष मून तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी व उत्साहपूर्ण होते. उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या समतावादी विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.



