ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पहाडावर धावणाऱ्याला ‘लालपरी’ला चांगले दिवस कधी?

जीर्ण बस, वारंवार बिघाड अन् जीव मुठीत धरून प्रवास; नव्या एसटी बस ताफ्याची नागरिकांची आर्त मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ ही ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. शिक्षण, आरोग्य, रोजगार, बाजारपेठ, शासकीय कामे तसेच दैनंदिन प्रवासासाठी हजारो नागरिक आजही एसटीवरच अवलंबून आहेत. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही जिवती तालुक्यातील अतिदुर्गम भागात धावणाऱ्या एसटी बसची दुरवस्था कायम असून वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. त्यामुळे “लालपरीला अखेर चांगले दिवस कधी येणार?” असा संतप्त सवाल जिवती तालुक्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जिवतीसारख्या अतिदुर्गम व डोंगराळ भागात धावणाऱ्या अनेक एसटी बसांनी आयुर्मर्यादा ओलांडली असून इंजिन बिघाड, गिअर बॉक्स निकामी होणे, झिजलेले टायर, ब्रेक यंत्रणेतील दोष आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे बस वारंवार रस्त्यातच बंद पडत आहेत. परिणामी प्रवाशांना तासन्तास उघड्यावर थांबावे लागत असून अनेक वेळा त्यांना पर्यायी वाहतुकीचा आधारही मिळत नाही.तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने मदत मिळण्यास विलंब होतो. विशेषतः पावसाळ्यात खराब रस्ते, खोल खड्डे, निसरडी वळणे आणि जीर्ण बस यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढतो. अशा परिस्थितीत विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी आणि रुग्ण यांना मोठ्या मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बस उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तर गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

एसटी महामंडळ केवळ प्रवासी वाहतुकीपुरते मर्यादित नसून पार्सल सेवा, निवडणुकांदरम्यान ईव्हीएम मशीनची वाहतूक तसेच विविध शासकीय कामांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तरीही दुर्गम भागातील नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. उलट वारंवार बिघाड होणाऱ्या जुन्याच बसेस या मार्गावर धावतात. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून सुरक्षित आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतुकीच्या अधिकाराकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागाचा विकास, शिक्षण, आरोग्य सेवा आणि आर्थिक घडामोडी सक्षम करण्यासाठी सुरक्षित, नियमित आणि विश्वासार्ह बससेवा अत्यावश्यक आहे. त्यामुळे आयुर्मर्यादा संपलेल्या बसेस तातडीने सेवेतून हटवून आधुनिक तंत्रज्ञानयुक्त, सुरक्षित व आरामदायी नव्या बसेस या मार्गावर उपलब्ध कराव्यात, बसफेऱ्या नियमित कराव्यात तसेच डोंगराळ रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

“एसटीचा प्रवास… सुखाचा प्रवास” हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवायचे असेल, तर दुर्गम भागातील ‘लालपरी’ला नवसंजीवनी देणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही काळाची गरज बनली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये