ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीचा वरदविनायक विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक : गणेश पुरानात या मंदिराचे वर्णन

गवराळ्याचा वरदविनायक भाविकांचे श्रद्धास्थान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           भारतातील ऐतिहासिक नगरापैकी एक असलेले “भांदक” अर्थातच आजचे भद्रावती विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आहे इथे उपलब्ध असलेल्या अनेक मूर्ती आणि देवालय प्राचीनतेची साक्ष देतात.

          भद्रावती शहरापासून अगदी २ किलोमीटर अंतरावर असलेल्या गवराळा येथे प्राचीन श्री गणेशाचे मंदिर आहे. गवराळ्याचा वरद विनायक हीच या मंदिराची ओळख. उत्तरामुखी असलेल्या या मंदिरात ६ फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती आहे. या मूर्तीचे पोट पोकळ असून ते सुमारे 40 ते 50 वर्षांपूर्वी धनसंपत्तीच्या लालसेने फोडण्यात आल्याची माहिती गवराळ्याची जुनी लोक आजही देतात. त्यानंतर सिमेंटने मूर्तीचे पोट पूर्ववत करण्यात आले. संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेले हे पावन मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

*वरद विनायक मंदिराचा इतिहास*

         मंदिराच्या खांबावर कोरलेल्या शिलालेख आणि ताम्रपट या मंदिराच्या प्राचीनतेची ओळख आहे. गणेश पुरानातही या मंदिराचे वर्णन केल्याचे आढळते. गणेश भक्त गुत्समग नावाच्या ऋषीने भगवान गणेशाचे वर मिळाल्याने त्याचे पुण्य फेडण्यासाठी गणेश मूर्ती विराजमान केल्याचा उल्लेख आढळतो. यानंतर सहवा चालुक्यसम्राट आणि विक्रमआदित्य यांनी इ. सन. १०८७ ते ११२६ च्या कालखंडात येथे मंदिर बांधले असावे असे सांगितले जाते. समर्थ रामदास स्वामी हे चंद्रपूरहुन रामटेक येथे जात असताना गवराळा येथील मंदिरात भेट दिल्याची माहिती जाणकारांकडून सांगितल्या जाते. विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील चिंतामणी गणेशानंतर या वरदविनायकाचे स्थान विदर्भातील अष्टविनायकांपैकी फारच महत्त्वपूर्ण समजल्या जाते. वरद विनायकाचे मंदिर हे टेकडीवर असून चढण्याकरिता पायऱ्या आहेत. टेकडीवर लागून असलेल्या मागील बाजूस रेल्वे लाईन लगत महालात जाण्याकरिता एक भुयारी मार्ग असल्याचे जुने वयोवृद्ध लोक सांगतात.

*यवनाश्व स्वराजाची राजधानी गवराळा-भद्रावती*

       यवनाश्व (यवनाक्ष) राजाची राजधानी म्हणून गवराळ्याचा उल्लेख केला जातो. या टेकडीवर वरात विनायक विराजमान आहेत. तेथेच या राजांचे महाल होते. आजही या महालाची वैशिष्ट्ये या ठिकाणी जाणवतात. वरद विनायक मंदिराच्या अगदी पायथ्याशी दगडाची कोरलेली गुफा आजही अस्तित्वात आहे. या गुफेत कुंड असून यवनाश्व राजाच्या पत्नीचे म्हणजेच राणीचे नाणी घर असल्याचे न्हाणीघर असल्याचे या कुंडावरून भासते.

*वरदविनायकांच्या सोबतीला हनुमानजी*

     श्री वरद विनायक मंदिराच्या अगदी समोरच हनुमानजींचे मंदिर आहे. या मंदिराला हजारो वर्षाचा कालखंड असल्याचे सांगितले जाते. हनुमान मंदिर पूर्वमुखी असून या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. तर समोरच एक भरपूर पाणी भरलेली पुरातन दगडानी बांधलेली विहीर आहे. हनुमान मंदिरापासून गणेश मंदिरापर्यंत भुयारी मार्ग असल्याचे वृद्ध सांगतात.

*ऐतिहासिक आसना तलाव*

          मंदिराच्या शेजारी एक तलाव आहे हा तलाव आसनाचा तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. हा प्राचीन व ऐतिहासिक तलाव एकेकाडी गवराळा येथील ग्रामस्थांची तहान भागवत होते. संपूर्ण गावातील ग्रामस्थ या तलावाचे पाणी वापरत होते. मात्र आता या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भद्रावती, गवराळा व अन्य परिसरातील श्री गणेश, शारदा, दुर्गा उत्सवानंतर मुर्त्यांचे विसर्जनही याच तलावात केले जात होते.

          आजही या तलावात नागरिक मनोभावे मुर्त्यांचे विसर्जन करतात हे मात्र तेवढेच खरे. मात्र खाजगी मालकी असलेले हे तलाव येथील डेव्हलपर्सला काही वर्षांपूर्वी विकल्या गेले. मंदिराच्या बाजूला असलेल्या या तलावाचे सौंदर्यकरण केल्यास पर्यटनाच्या दृष्टीने आणि भाविकांची गर्दी खेचण्याकरिता अधिक महत्त्वाचे ठरेल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये