आष्टी फाटा–गुळगाव–वडेगाव मार्गावरील रस्त्याची दुरवस्था
खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण : तातडीने दुरुस्तीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील आष्टी फाटा–गुळगाव–वडेगाव या प्रमुख मार्गाची पावसामुळे अत्यंत दुरवस्था झाली असून संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर रोज एक-दोन अपघात होत असून हा रस्ता अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. संबंधित विभागाकडून अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर वरोरा–भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. करण देवतळे साहेब यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन आष्टी फाटा–गुळगाव–वडेगाव मार्गावरील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



