आर्वी-धानोरा मार्गाच्या दूरावस्थेमुळे १६ तास वाहतूक ठप्प
अती ओव्हरलोड ट्रक वाहतुकीचा परिणाम ; तेलंगणा जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यातील आर्वी–धानोरा (तेलंगणा) जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाची अतिअवजड व रेतीच्या ओव्हरलोड ट्रकांच्या सततच्या वाहतुकीमुळे अक्षरशः दुरवस्था झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने बुधवारला दोन ट्रक समोरसमोर फसल्याने वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. पावसामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, तेलंगणा सीमेवरील लक्कडकोट येथील आरटीओ तपासणी नाका टाळण्यासाठी रेती व इतर मालवाहतूक करणारे ट्रक या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. हे ट्रक तेलंगणा तसेच इतर राज्यांकडे जात असल्याने रस्त्यावर प्रचंड ताण येत आहे. परिणामी, रस्ता पूर्णपणे खराब झाला असून अनेक ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत.
पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने ट्रक वारंवार अडकत आहेत. अशाच प्रकारामुळे बुधवारला सुमारे १६ तास हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहिला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णवाहिकांनाही मोठा फटका बसला. आर्वीकडून तेलंगणाकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांना कोठारी, लाठी, विरूर या मार्गाने सुमारे ३० किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घेऊन जावे लागले, त्यामुळे रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, कोठारी, लाठी आणि विरूर परिसरातील संबंधित यंत्रणा व पोलिसांकडून ओव्हरलोड वाहतुकीवर प्रभावी कारवाई केली जात नसून, त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून ओव्हरलोड वाहतुकीवर कठोर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
ओवरलोड़ ट्रक वाहतुक थांबवली नाही तर आर्वी फट्यावर मोठे जनआंदोलन करणार. संबंधित विभागाने ओवरलोड़ ट्रकाचा मार्ग बदलावा.
*नरेंद्र वाघाडे, माजी सरपंच वेज़गाव*



