ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी

सहकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव; _चिवंडा परिसरात दहशतीचे वातावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

 गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा येथील गुराखी अशोक भीमा आत्राम (वय ५०) यांच्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास वाघाने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांच्या सोबत आणखी एक गुराखीही गुरे चारण्यासाठी जंगलात गेला होता. सहकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे अशोक आत्राम यांचा जीव वाचल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे चिवंडा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने जखमीला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक आत्राम व त्यांचे एक सहकारी नेहमीप्रमाणे गावालगतच्या जंगलात गुरे चारण्यासाठी गेले होते. दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक अशोक आत्राम यांच्यावर झडप घालत त्यांना पकडले. हा थरार पाहून त्यांच्या सोबत असलेल्या गुराख्याने धाडस दाखवत कसाबसा वाघाच्या तावडीतून अशोक आत्राम यांची सुटका केली आणि त्यांना गावात आणले. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.

घटनेनंतर चिवंडा व परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगतच्या शेतात काम करणारे शेतकरी आणि गुराखी भयभीत झाले असून, वनविभागाने तातडीने परिसरात गस्त वाढवून वाघाचा बंदोबस्त करावा, तसेच जखमी अशोक आत्राम यांना त्वरित आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये