ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खुलेआम नियमांची पायमल्ली! उघड्या कचरा वाहतुकीमुळे रस्त्यांवर दुर्गंधीचे साम्राज्य

जबाबदार विभाग मात्र मूकदर्शक

चांदा ब्लास्ट

घुग्घूस, चंद्रपूर : स्वच्छता अभियान आणि कचरामुक्त भारताच्या मोठमोठ्या घोषणांदरम्यान घुग्घूस शहरातील वास्तव मात्र वेगळीच कहाणी सांगत आहे. शहरात दुर्गंधीयुक्त कचऱ्याची वाहतूक उघडपणे नियमांची पायमल्ली करत केली जात आहे. कचरा वाहून नेणारी वाहने झाकून नेणे बंधनकारक असतानाही हा नियम केवळ कागदोपत्रीच असल्याचे चित्र दिसत आहे.

चंद्रपूर-वणी मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक, घुग्घूस पोलीस ठाण्यासमोरील परिसर ते नकोडा मार्गावरील सिमेंट कंपनीपर्यंतच्या रस्त्यावर दररोज उघड्या वाहनांमधून कचऱ्याची वाहतूक होताना दिसते. या वाहनांमधून रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा सांडत असून संपूर्ण मार्गावर दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे पादचारी, वाहनचालक तसेच परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, शहरातील हा प्रमुख मार्ग असतानाही RTO, वाहतूक पोलीस, MPCB आणि नगर परिषद प्रशासनाच्या नजरेस हा उघड नियमभंग का पडत नाही? संबंधित विभागांची जबाबदारी केवळ कागदी कारवाईपुरतीच मर्यादित आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

एका बाजूला शासन “स्वच्छ भारत” आणि “कचरामुक्त भारत” यांसारख्या अभियानांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहे, तर दुसऱ्या बाजूला उघड्या वाहनांमधून कचरा वाहतूक करून शहरातील रस्ते घाण आणि दुर्गंधीने भरले जात आहेत. अशा परिस्थितीत स्वच्छतेबाबतच्या सरकारी दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे.

स्थानिक नागरिकांनी कचरा वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना नियमानुसार पूर्णपणे झाकूनच वाहतूक करण्याची सक्ती करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जोपर्यंत संबंधित विभाग आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडत नाहीत, तोपर्यंत शहराला दुर्गंधी आणि अस्वच्छतेपासून मुक्ती मिळणे कठीण असल्याचे नागरिकांचे मत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये