ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरी आगाराच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’च्या पाच नवीन बस दाखल

विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पाठपुराव्याला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ब्रम्हपुरी आगाराच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ नावाच्या पाच नवीन बस दाखल झाल्या असून, त्यांचा लोकार्पण सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने ब्रम्हपुरी आगाराला या बस उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे परिसरातील हजारो प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

ब्रम्हपुरी आगारात आयोजित लोकार्पण सोहळ्याप्रसंगी नगराध्यक्ष योगेश मिसार, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. नितीन उराडे, आरोग्य सभापती मनोज कावळे, नगरसेवक राकेश पडोळे, पुष्पाकर बांगरे, वकार खान, अविनाश राऊत, मनोज भूपाल, अमिताभ नागमोती, मुकुंदा राऊत, प्रभारी आगार व्यवस्थापक वासनिक तसेच वाहतूक निरीक्षक राजू पांडव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवीन बस उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी आगाराच्या विकासासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राज्य परिवहनची सेवा ही जीवनवाहिनी असून, नवीन बसमुळे आगाराची प्रवासी वाहतूक क्षमता वाढणार आहे. तसेच जुन्या बसवरील ताण कमी होऊन विविध मार्गांवरील बससेवा अधिक नियमित, कार्यक्षम व विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे.

ब्रम्हपुरी हे पूर्व विदर्भातील शिक्षण व आरोग्य क्षेत्राचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी आणि रुग्ण उपचारासाठी दररोज मोठ्या संख्येने ब्रम्हपुरीत ये-जा करतात. त्यामुळे ब्रम्हपुरी आगारातून विविध मार्गांवर मोठ्या प्रमाणात बसफेऱ्या सुरू असतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता आगारात अधिक बसांची आवश्यकता दीर्घकाळापासून व्यक्त केली जात होती. अशा परिस्थितीत नव्याने प्राप्त झालेल्या पाच ‘राजमाता जिजाऊ’ बस मुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, बससेवा अधिक सक्षम व गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कार्यक्रमास आगारातील अधिकारी, यांत्रिक विभागातील कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, चालक, वाहक तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर नवीन बसांचे पूजन करून त्या विविध मार्गांवर प्रवासी सेवेसाठी रवाना करण्यात आल्या.

ब्रम्हपुरीसह संपूर्ण परिसरातील नागरिकांनी नवीन बस उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता भविष्यात ब्रम्हपुरी आगाराला आणखी नवीन बस उपलब्ध करून देण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये