ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्मशानभूमीच्या रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधकामाची करंजीकरांची मागणी

भाजप शिष्टमंडळाचे आ. देवराव भोंगळेना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील मोठ्या गावांपैकी करंजी हे गाव. या गावची लोकसंख्या पाच हजाराच्या घरात आहे. गावात अद्याप अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. गावांमध्ये स्मशानभूमी आहे, मात्र जाण्यासाठीच्या मार्गावर नाला आहे. यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या मार्गावर कंबरभर पाणी साचते. पावसाच्या दिवसांमध्ये यातून प्रवास करणे त्रासदायक होते. अशावेळी स्मशानभूमी मार्गावर तातडीने पूल बांधकाम करावे, अशी मागणी करंजी येथील शिष्टमंडळाने आमदार देवराव भोंगळे यांना निवेदनाद्वारे केली.

करंजी ग्रामपंचायत अंतर्गत करंजी, जोगापूर आणि दुबागुडा अशी गावे येतात. विकासाच्या वाटेवरील या गावांमध्ये अद्यापही अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. या गावांमध्ये स्मशानभूमी मार्गावर असलेल्या नाल्यामुळे गावकऱ्यांना मृत्यूनंतरही नरकयातना सहन कराव्या लागतात. पावसाच्या दिवसांमध्ये कंबरभर पाण्यातून नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी जावे लागते. ही गंभीर बाब स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदार भोंगळे यांच्या लक्षात आणून दिली.

यासह गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गांचा भरणा आहे. गावासभोवताल शेती आहे. शेती आणि शेतमजुरी यावर करंजी वासियांची भिस्त आहे. अशा वेळी स्थानिक नागरिकांना आपापल्या शेतीमध्ये जाण्यासाठी सोयीचे व्हावे. शेतमाल काढून बाजारपेठेत सहज नेता यावा, यासाठी मुख्यमंत्री शेत बळीराजा पांदन रस्ते योजनेअंतर्गत गावातील पांदन रस्ते मंजूर करावे, अशी विनंती यावेळी स्थानिक शिष्टमंडळाने आमदार देवराव भोंगळे यांना निवेदनातून केली.

या शिष्टमंडळामध्ये भाजपच्या महिला पदाधिकारी सुरेखा श्रीकोंडावार, ग्रा.पं. सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समीर निमगडे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते राकेश चापले, बूथ प्रमुख सागर आल्लूरवार, उत्कर्ष मानपल्लीवार, शिवसेना शिंदे गटाचे उपतालुकाप्रमुख वैभव निमगडे, बादल देऊरमल्ले, देवसरी मच्छीमारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष नितेश गोहने, वणाश्रम जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष विशाल कोडापे आदींची उपस्थिती होती. यावेळी स्मशानभूमी मार्गावर पूल निर्मिती बाबत आपण अतिशय सकारात्मक असल्याची ग्वाही आमदार भोंगळे यांनी शिष्टमंडळाला दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये