मराठवड्यातील सहकाराची उज्ज्वल परंपरा व वारसा जपण्यासाठी कायम प्रयत्न करणार– संदीप शेळके.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने आयोजित ग्राहक मेळावा जालना रोडवरील इंडियाना हॉटेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संदीप शेळके होते. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष द्वारकादास पाथ्रीकर, उद्योजक डॉ. डी. एस. काटे,हरीश लखानी, महाराष्ट्र-गोवा बार कॉन्सिलचे सदस्य ॲड.ज्ञानेश्वर बागुल, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र घायवट तसेच उमंग मॅटर्निटी अँड IVF हॉस्पिटलच्या डॉ. अश्विनी देशमुख यांनी मार्गदर्शन करत संस्थेच्या अल्पावधीत झालेल्या उल्लेखनीय प्रगतीचे आणि सहकार क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी म.न.पा. शिक्षण विभागाचे उपआयुक्त अंकुश पांढरे व जिल्हा परिषद सदस्या गीता पाथ्रीकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्यात गुणवंत विद्यार्थी, उद्योजक, सेवानिवृत्त शिक्षक, सेवानिवृत्त सैनिक तसेच विविध शासकीय कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. डी. एस. काटे यांनी आपल्या मनोगतात प्रत्येकाने बचतीची सवय, संपत्ती निर्मितीची जाणीव आणि आर्थिक स्वावलंबनाची संस्कृती रुजविण्याची गरज अधोरेखित केली. आर्थिक नियोजन हीच भविष्याची खरी ताकद असल्याचे सांगितले. द्वारकादास पाथ्रीकर यांनी विविध अभंग, श्लोक तसेच रामायण आणि महाभारतातील दाखले देत सहकाराचे महत्त्व विशद केले. संस्थेने समाजाभिमुख दृष्टीकोनातून उभारलेले कार्य उल्लेखनीय असून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याची संस्थेची वाटचाल प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात संदीप शेळके यांनी “मराठवड्यातील सहकाराची उज्वल परंपरा व वारसा जपण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू तसेच सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी राजर्षी शाहू मल्टीस्टेट कायम कार्यरत राहील,” असा विश्वास व्यक्त केला. संस्थेमार्फत राबविण्यात येणारे भव्य रक्तदान शिबीर, शेतकरी यांच्या बांधावर खत पुरविण्याचा उपक्रम, आदिवासी भागातील महिलांना दिवाळी निमित्त भेटवस्तू वाटप, आर्थिक साक्षरता अभियान यांसह विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला.
तसेच व्यावसायिक आणि बँकिंग क्षेत्राच्या प्रभावी माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आर्थिक सेवा, मार्गदर्शन आणि विकासाच्या संधी पोहोचविण्यासाठी संस्था भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विश्वास, पारदर्शकता आणि समाजसेवा या त्रिसूत्रीवर राजर्षी शाहू मल्टीस्टेटची वाटचाल सुरू असून भविष्यातही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध राहील, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन गोविंद येवले यांनी तर आभार प्रदर्शन मेजर सुरोशे सर यांनी केले.
याप्रसंगी स्थानिक संचालक मंडळ, ग्राहक, सभासद, भागधारक, सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, विभागीय व्यवस्थापक चेतन गवते, सहायक विभागीय व्यवस्थापकमीनाक्षी साळुंके, शाखा व्यवस्थापक कल्याणी पडघान, राजू खडके यांच्यासह कर्मचारी वर्ग व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



