ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाच दिवसांपासून पोंभूर्णा शहर तहानलेले; रविवारीही पाणीपुरवठा न झाल्यास ‘कोरडे घागर फोडा’ आंदोलनाचा इशारा

पाणीपुरवठा सभापती केरळ दौऱ्यावर मौजमस्ती करण्यात मस्त शहरात मात्र नागरिकांची पाण्यासाठी वणवण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा : शहरात गेल्या पाच दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक भागांमध्ये नागरिकांना खासगी पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतापाची लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते **अविनाश वाळके** यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नगरपंचायत प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक प्रश्नाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांचा संयम संपत चालल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी **पाणीपुरवठा सभापती केरळ दौऱ्यावर मौजमस्ती करण्यात मस्त असताना शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचा आरोप** केला. शहर गंभीर पाणीटंचाईचा सामना करत असताना संबंधित जबाबदार पदाधिकाऱ्यांनी परिस्थितीकडे तातडीने लक्ष देणे अपेक्षित होते. मात्र नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी त्या दुर्लक्षित केल्या जात असल्याची भावना नागरिकांमध्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नगरपंचायत प्रशासनाने तातडीने शहरातील नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

**रविवारपर्यंत शहरात नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास पोंभूर्णा नगरपंचायत कार्यालयासमोर ‘कोरडे घागर फोडा’ आंदोलन करण्यात येईल,** असा इशारा अविनाश वाळके यांनी दिला. या आंदोलनात शहरातील महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, निर्माण होणाऱ्या परिस्थितीस नगरपंचायत प्रशासन व संबंधित पदाधिकारी जबाबदार राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून, प्रशासनाने या गंभीर प्रश्नावर तातडीने कार्यवाही करून शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये