शाळेचे शिक्षक बीएलओ कामात “बिझी..”_ विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे होणार “इझी..!”
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
यावर्षीचे शैक्षणिक सत्र ३० जूनपासून सुरू करण्यात आले. मात्र, ज्या दिवशी शाळा सुरू झाल्या त्याच दिवसापासून शाळेतील शिक्षकांना एक महिना बीएलओ म्हणून मतदारांच्या गृहभेटी घ्यायच्या असून, या महिनाभरात शाळेतील शिक्षक आपल्या मतदान केंद्रातील मतदारयाद्यांच्या कामात बिझी असल्याने आपल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण खरचं इझी होणार का..?, हा प्रश्न पालकांसह सुजान नागरिकांना भेडसावत आहे.
राज्य सरकार एकीकडे शिक्षकांवर बीएलओच्या कामाचे ओझे टाकले जाणार नाही, असे सांगून केवळ चर्चा घडवून आणत असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील बऱ्याच शिक्षकांना या कामासाठी नियुक्त केले असून, काही शाळांत एका शिक्षक ठेवून उर्वरित शिक्षकांना बीएलओच्या कामात जुंपले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.
शिक्षकांना अतिरिक्त कामे लावून वरून जिल्हा परिषद शाळांचे गुणवत्ता वाढविण्यासंदर्भात मोठमोठ्या गोष्टी करायच्या. मात्र, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसंदर्भात ठोस उपाययोजना थंडबस्त्यात, हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.
तालुक्यात बीएलओच्या कामासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांची संख्या उल्लेखनीय आहे. एक ते सात वर्गाच्या शाळांतील एक दोन शिक्षक वगळता उर्वरित, सर्व शिक्षकांची या कामासाठी नियुक्ती केली आहे. एका शिक्षकावर सात वर्गाचा भार टाकने योग्य आहे का..?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हल्ली शिक्षक बीएलओच्या कामाने परेशान झाले असून, त्यांना यातून मुक्ती हवी आहे.
शासन या कामासाठी शिक्षकांचीच नियुक्ती करीत असून, आतातरी सरकारने यावर विचार करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकारने शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करून त्यांना पूर्णवेळ शाळेतील शैक्षणिक कामात बिझी ठेवल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण इझी होण्यास वेळ लागणार नाही, यात शंका नाही.
*शैक्षणिक गुणवत्तेची “ऐसी_तैसी”*
शिक्षकांना बिओलोच्या कामात लावून शैक्षणिक गुणवत्तेची ऐसी की तैसी केली जात आहे. हा प्रकार शैक्षणिक प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये एकच शिक्षक असल्याने, शिक्षणाचा पुरता बोजवारा उडत असून, पालकवर्गांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करून, त्यांना शैक्षणिक कामात व्यस्त ठेवावे, अशी विद्यार्थी व पालकवर्गातून मागणी होत आहे.



