ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला “विनयभंग” प्रकरणातील फरार आरोपी भानेश येगेवारचा जामीन..!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील विनयभंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा तालुका पदाधिकारी भानेश येगेवार याला जिल्हा सत्र न्यायालयाने अतिशय मोठा झटका दिला आहे. अटकेपासून वाचण्यासाठी आणि अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आरोपीने केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक २ चे माननीय न्यायाधीश मुठाळ साहेब यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या या धडाकेबाज निर्णयामुळे आता फरार आरोपी भानेश येगेवार याच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली असून, त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील एका पीडित महिलेने हिंमत दाखवून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. धक्कादायक बाब म्हणजे ही पीडित महिला आरोपीच्या स्वतःच्या साल्याची पत्नी असल्याचे समोर आले आहे. शेतीचा हंगाम सुरू असल्याने घरातील सर्व सदस्य शेतात गेले होते, हीच संधी साधून सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या भावेश येगेवार याने पीडितेच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. तिथे पीडितेचा विनयभंग करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा अत्यंत निंदनीय प्रयत्न केला.

 या धक्कादायक घटनेनंतर पीडितेने गोंडपिपरी पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य ओळखून नवीन फौजदारी कायद्यानुसार (भारतीय न्याय संहिता) आरोपी भानेश येगेवार याच्याविरुद्ध कलम ७४, ७५ आणि कलम ३५१/२ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटूनही सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात विलंब केला जात असल्याचा आरोप होत होता.

या घटनेच्या तीव्र पडसादानंतर महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष माधुरी गडेकर, नगरसेविका वनिता वाघाडे यांच्यासह शेकडो महिलांनी पोलीस ठाण्यावर ठाणेदारांना निवेदन दिले होते व कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करण्याची मागणी करत ठाणेदारांना इशारा दिला होता.

गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अटकेच्या भीतीने आरोपी भानेश येगेवार पोलिसांना सतत चकमा देत फरार झाला होता. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्याने जिल्हा सत्र न्यायालय दोनमध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याला आशा होती की, राजकीय व आर्थिक हितसंबंधांच्या बळावर आपल्याला कायदेशीर संरक्षण मिळेल. परंतु, न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य आणि पीडितेची बाजू लक्षात घेऊन आरोपीची याचिका पूर्णपणे फेटाळून लावली. न्यायाधीश मुठाळ साहेब यांच्या या कडक भूमिकेमुळे कायद्याचे रक्षक अजूनही जिवंत असल्याचा विश्वास सामान्य जनतेमध्ये निर्माण झाला आहे.

आता न्यायालयाकडून जामीन नामंजूर झाल्यामुळे पोलिसांवर असलेला तथाकथित राजकीय दबाव पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे. सामान्य माणसाने लहानसा जरी गुन्हा केला तरी त्याला घरातून उचलून आणणारे पोलीस, सत्ताधारी पक्षाच्या या नेत्याला अटक करण्यात आता तरी तत्परता दाखवणार का.? न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आता गोंडपिपरी पोलीस या नराधम आरोपीला तात्काळ बेड्या ठोकणार की त्याला पाठीशी घालणार, याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये