ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

व्याजाने पैसे देण्याच्या नावाखाली शेतजमीन विक्री केल्याचा आरोप

८४ वर्षीय वृद्धाची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        व्याजाने पैसे देण्याच्या नावाखाली शेतजमीन गहाण ठेवण्याचे सांगून प्रत्यक्षात जमीन विक्री करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप ८४ वर्षीय वामन लहानू खापणे, रा. आबामक्ता, ता. वरोरा यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, नातवाच्या शिक्षणासाठी ३ लाख ६० हजार रुपयांची गरज असल्याने सिदार्थ महादेव ढोके यांच्याकडून २ टक्के व्याजाने रक्कम घेण्याचे ठरले. त्यासाठी आबामक्ता येथील ०.७१ हेक्टर शेतजमीन गहाण ठेवण्याचे सांगण्यात आले; मात्र ती जमीन हर्षल शालिक किरमे यांच्या नावावर विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे.

तसेच बँक खात्यात जमा झालेल्या रकमेपैकी ५० हजार व ३ लाख रुपये आपल्या परवानगीशिवाय काढण्यात आल्याचा दावा खापणे यांनी केला असून, बँक CCTV, KYC कागदपत्रे, विथड्रॉल स्लिप व इतर नोंदी तपासण्याची मागणी केली आहे.

दुसऱ्या सामायिक शेतजमिनीबाबतही गहाण व्यवहाराऐवजी विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्ती, एजंट तसेच ऑनलाइन आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सिदार्थ ढोके यांच्याकडे वैध सावकारी परवाना आहे का, यासह यापूर्वी अशाच प्रकारचे जमीन व्यवहार झाले आहेत का, याचीही चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. आरोपांची सत्यता पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार असून, दोष आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ८४ वर्षीय खापणे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये