ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाला नवी झेप

शेतकरी भवन, आधुनिक गोदाम आणि व्यापारी संकुलाच्या कामांचे माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण. 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शेतकऱ्यांच्या सुविधा, शेतीमालाची साठवणूक आणि व्यापारवृद्धीला मिळणार चालना.

राजुरा :- शेतकऱ्यांना अधिकाधिक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि व्यापारी विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. बाजार समितीच्या प्रांगणात प्रस्तावित शेतकरी भवन, नवीन गोदाम आणि व्यापारी संकुल (शॉपिंग कॉम्प्लेक्स) या विकासकामांचा भूमिपूजन आणि नवीन खुल्या लिलाव शेड चा लोकार्पण सोहळा माजी आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

       कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या विक्रीसाठी सुसज्ज बाजारपेठ, सुरक्षित साठवणूक व्यवस्था आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. याच दूरदृष्टीतून शेतकरी भवन, आधुनिक गोदाम आणि व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात येत आहे. या विकासकामांमुळे शेतकऱ्यांना विविध कामांसाठी सोयीस्कर सुविधा उपलब्ध होतील, शेतमालाच्या साठवणुकीची क्षमता वाढेल तसेच व्यापाऱ्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध होऊन बाजार समितीच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होणार आहे.

       यावेळी बोलताना माजी आमदार सुभाषभाऊ धोटे म्हणाले की, शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बाजार समितीचा आत्मा आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळण्यासाठी केवळ उत्पादन वाढणे पुरेसे नाही, तर त्यांना शेतमालाच्या विक्रीसाठी सक्षम बाजारपेठ, योग्य साठवणूक व्यवस्था आणि आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी भवन, गोदाम आणि व्यापारी संकुल, लिलाव शेड ची उभारणी होणे ही समाधानाची बाब आहे. या सुविधांमुळे शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती या तिन्ही घटकांना लाभ होईल. बाजार समितीचा विकास हा केवळ इमारतींच्या उभारणीपुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीशी जोडलेला असला पाहिजे. भविष्यातही शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवून बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू. तर सभापती तिरुपती इंदूरवार यांनी बाजार समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या आणि येणाऱ्या काळात प्रस्तावित विकास कामांचा आराखडा सादर केला. यावेळी नगराध्यक्ष अरुण धोटे तसेच उपस्थित संचालकांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती तिरुपती मलय्या इंदुरवार होते. प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, उपसभापती संजय पावडे, संचालक अॅड. अरुण धोटे, विकास देवाळकर, उमाकांत धांडे, विनोद झाडे, दिलीप देठे, गोपाल झंवर, नवनाथ पिंगे, राकेश हिंगाने, लहू बोंडे, सरिता रेड्डी, जगदीश बुटले, प्रफुल कावळे, आशिष नलगे, विठाबाई झाडे, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेणेकर, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, राधेश्याम अडानीया, गोपाल सारडा, विष्णुप्रसाद नवंधर, अजय रेड्डी, संतोष गटलेवार, नगरपरिषद सभापती अनंता ताजने, पूनम गिरसावळे, नगरसेवक इंदूबाई निकोडे, निता बानकर, एजाज अहमद, अभिजीत धोटे, राजाराम येल्ला, भूषण बानकर, मनीष येरणे, अनिल आलाम, तुकाराम माणूसमारे, कवडू सातपुते, कोमल फुसाटे, धनराज चिंचोलकर तसेच आर्किटेक्ट रवी पचारे यांची उपस्थिती होती.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीच्या सचिव मोनिका मेश्राम यांनी केले. संचालन संचालक गोपाल झंवर यांनी तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक पराग बोढे यांनी केले. यावेळी बाजार समितीचे सन्माननीय संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि व्यापारी, मापारी, हमाल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये