देऊळगाव राजा येथे श्री बालाजी महाराजांचा कार्तिक मंडपोत्सव संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी . प्रा . अशोक डोईफोडे
प्रतीतिरूपती म्हणून ख्याती असलेल्या देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांचा कार्तिक महोत्सव प्रसन्न व मंगलमय वातावरणात सुरू झाला आहे. गुरुवार, दि.१९ नोव्हेंबर रोजी कार्तिक मंडपोत्सव संपन्न झाला. या प्रसंगी सर्व समाजाचे मानकरी, सेवेकरी, ब्राम्हणवृंद, पुजारी वृंद, श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, राणीसाहेब सौ. छायाराजे जाधव, यात्रा समिती सदस्य तसेच संस्थानचे व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने व दोरांच्या सहाय्याने श्रींच्या मंदिरापासून गणपती मंदिरापर्यंत १६ कापडी मंडप उभारण्यात आले. दुपारी ३.० ते ४.५ पर्यंत कार्तिक मंडपोत्सव संपन्न झाला. मंडपोत्सवानंतर सर्वांनी श्री गणपतीचे व श्री बालाजींचे दर्शन घेतले. त्यानंतर मानकरी यांना धर्माधिकारी यांच्या हस्ते खोबर्याचे वाटप करण्यात आले.
कार्तिक शुद्ध एक, दीपावली पाडवा, दि.१० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत श्रींचा कार्तिक उत्सव संपन्न होईल. रविवार, दि.२२ नोव्हेंबर रोजी दीपोत्सवास सुरूवात होईल. या दरम्यान श्री बालाजी महाराजांचा गाभारा विशेष मखराने सजवण्यात येतो. या उत्सवादरम्यान श्री बालाजी संस्थानच्या वतीने श्री बालाजी महाराजांच्या मंदिरासमोर स्टीलच्या कठड्यांवर दिव्यांची आरास ठेवून रोषणाई केली जाते. श्रींच्या दर्शनासाठी येणारे भक्त विशेषत: महिला दिव्यांमध्ये तेल घालून दिवे प्रज्वलीत ठेवतात, त्यामुळे श्रींच्या मंदिरासमोरील वातावरण तेजोमय राहते. हा दीपोत्सव कार्तिक लळीतापर्यंत साजरा करण्यात येतो.
महाद्वाराजवळील मारोतीच्या बैठकीवर दि.२४ नोव्हेंबर रोजी रात्री गोंधळाचा कार्यक्रम सुरू होईल, जो कार्तिक लळीतापर्यंत दररोज असेल. याप्रसंगी श्री बालाजी व इतर देवी देवतांची भावगीते सादर केली जातात.
दि. २८ नोव्हेंबर रोजी अनुष्ठान समाप्ती होईल. २१ ब्रह्मवृंदांकडून घटस्थापनेपासून सुरू असलेल्या यात्रेच्या अनुष्ठानाची सांगता होईल. कार्तिक उत्सवाचा समारोप दि.५ डिसेंबर रोजी लळित उत्सवाने होणार असून याप्रसंगी काल्याचे कीर्तन होईल. अशा प्रकारे श्री बालाजी महाराजांचा कार्तिक उत्सव संपन्न होणार असल्याची माहिती श्री बालाजी संस्थान तर्फे देण्यात आली आहे. सर्व भक्तांनी हजारोंच्या संख्येने श्री बालाजी फरसावर उपस्थित राहून कार्तिक महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी केले आहे.



