जिल्ह्यातील कोल वॉशरींमधील कोळसा भेसळ व वाहतूक घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा खा. धानोरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ जिल्ह्यातील कोळसा शुद्धीकरणाच्या नावाखाली कार्यरत असलेल्या काही कोल वॉशरींमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ सुरू असून आरसीआर च्या नावाखाली निम्न दर्जाच्या कोळशाचा पुरवठा करून कोट्यवधींचा वाहतूक घोटाळा केला जात असल्याचा गंभीर आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे. तसेच, या गंभीर विषयावर केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संसदेच्या आगामी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कोळसा वाहतुकीतील मोठ्या आर्थिक अनियमिततेवर बोट ठेवले आहे. एनटीपीसी आणि केपीसीएल यांच्या वीज प्रकल्पांसाठी आरसीआर अंतर्गत पांढरपवनी येथून कोळसा वाहतुकीचे टेंडर साईकृपा ट्रान्सपोर्ट आणि स्वामी फ्युल्स प्रा. लि. या कंपन्यांना देण्यात आले आहेत. खदानीपासून सायडिंगपर्यंतचे अंतर २२ ते २५ किलोमीटर असून त्याचे प्रत्यक्ष वाहतूक भाडे प्रति टन २५० रुपये इतके होते, म्हणजेच एकूण वाहतूक खर्च प्रति टन ३०० ते ३२५ रुपयांच्या घरात जातो. असे असताना संबंधित ठेकेदारांना अवघ्या ३० ते ४० रुपये प्रति टन दराने वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. इतक्या कमी दरात वाहतूक करणे अशक्य असताना, एकच भागीदार ठेवून वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली कामे घेत हा मोठा कोळसा वाहतूक घोटाळा केला जात असल्याचा संशय खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.
केवळ वाहतुकीतच नव्हे, तर काही कोल वॉशरींमध्ये कोळशाचे वजन वाढवण्यासाठी आणि अधिक नफा कमावण्यासाठी शुद्ध कोळशामध्ये ईएसपी डस्ट, राखड, कोळशाची चुरी आणि इतर टाकाऊ घटक मोठ्या प्रमाणात मिसळले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या भेसळयुक्त कोळशामुळे शासनाची व वीज निर्मिती प्रकल्पांची मोठी आर्थिक फसवणूक होत असून, संबंधित वीज केंद्रांच्या बॉयलर व महागड्या यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान होऊन वीज उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय, या प्रकारामुळे जिल्ह्यातील पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यालाही धोका पोहोचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कोल वॉशरी, कोळसा डेपो आणि साठवण केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात यावी, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. तसेच, सर्व वॉशरींमधील कोळशाचे नमुने स्वतंत्र व अधिकृत प्रयोगशाळेमार्फत तपासून भेसळ आढळल्यास संबंधित प्रकल्पांना होणारा पुरवठा तात्काळ थांबवावा आणि एनटीपीसीने आतापर्यंत किती वीज निर्मिती केली व त्यासाठी किती कोळसा वापरला याची सविस्तर माहिती जाहीर करावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.



