भिवगाव बु. येथे शेतरस्ता आणि नैसर्गिक नाला बुजविल्याचा आरोप ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे
रस्ता बंद झाल्याने कापूस वेचणी रखडली; नैसर्गिक पाण्याचा प्रवाहही अडविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : तालुक्यातील मौजे भिवगाव बु. येथे शेतात जाण्यासाठी असलेला शेतरस्ता तसेच नैसर्गिक पाण्याचा प्रवाह मुरूम टाकून अडविण्यात आल्याचा आरोप करीत गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदन सादर केले आहे. अडविण्यात आलेला शेतरस्ता आणि नैसर्गिक नाल्याचा प्रवाह तातडीने खुला करून द्यावा, तसेच संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, भिवगाव बु. येथील गट क्रमांक १३४, १३५, १३६, १३३, १३१, १३०, १४४, १४३, १४५ तसेच परिसरातील इतर गटांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. या जमिनींमध्ये शेती करून शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, शेतात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याचा प्रश्न यापूर्वीही निर्माण झाला होता. त्यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर १२ फेब्रुवारी २०२२ रोजी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत स्थळ पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२२ रोजी संबंधित रस्ता खुला करण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
त्यानंतर १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत या रस्त्याचा शेतकरी नियमित वापर करीत होते. मात्र, याच दिवशी मोहम्मद अब्दुला (रा. देऊळगाव राजा) यांनी रस्त्यावर मुरूम टाकून तो बंद केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
याच परिसरातील गट क्रमांक १४५ लगत पूर्व-पश्चिम दिशेने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असलेला नाला आहे. या नाल्यातून परिसरातील पावसाचे पाणी वाहून जाते. मात्र, हा नालाही १ नोव्हेंबर रोजी मुरूम टाकून पूर्णपणे बुजविण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या नाल्याचे मुख्यमंत्री जलजीवन मिशन योजनेअंतर्गत खोलीकरण करण्यात आले होते. नाल्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे पाणी साचून ते शेतांमध्ये शिरण्याची शक्यता असून, त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या शेतांमध्ये कापूस वेचणीचे काम सुरू आहे. मात्र, रस्ता बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पोहोचता येत नसून कापूस वेचणी रखडली आहे. कापूस शेतातच वाळत असल्याने आर्थिक नुकसान होण्याची भीतीही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी शेतकरी संबंधित रस्त्याने जात असताना मोहम्मद अब्दुला यांनी हा रस्ता तुमचा नाही, तुम्हाला येथून जाऊ देणार नाही, असे सांगून रस्ता खुला करण्यास नकार दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी हा रस्ता यापूर्वी तहसीलदारांच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात खुला करण्यात आल्याचे सांगितले. तरीही रस्ता खुला करण्यास नकार देण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
यापूर्वी खुला करण्यात आलेला शेतरस्ता पुन्हा बंद करणे तसेच नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविणे ही बाब गंभीर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने तातडीने स्थळ पाहणी करून शेतरस्ता आणि नैसर्गिक नाला खुला करून द्यावा. तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर भरत दामोधर शिरसाट, बबन रामभाऊ शिंदे, नारायण म्हातारबा कवलिंगे आणि राहुल संतोष कवलिंगे यांच्यासह 28 शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. आता तहसील प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन काय कार्यवाही करते, याकडे भिवगाव बु. येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे..



