“कुपोषणमुक्त विधानसभा”साठी आमदार देवराव भोंगळे यांचा वाढदिवसानिमित्त संकल्प
११ कुपोषित बालकांना 'बाळू भेट' देऊन सामाजिक बांधिलकीचा संदेश; राजुरा तालुका कुपोषणमुक्त करण्याचे नियोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मयुर बोंगीरवार यांच्या पुढाकाराने आणि ‘बाळू फाउंडेशन’च्या संयुक्त विद्यमाने एक अत्यंत स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत ग्रामीण भागातील ११ कुपोषित बालकांना ‘बाळू भेट’ (पोषण आहार संच) देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी बाळू फाउंडेशनचे कार्य आणि आमदार देवराव भोंगळे यांच्या सहकार्यातून एक महत्त्वाचा सामाजिक संकल्प करण्यात आला. सर्वप्रथम राजुरा तालुका पूर्णपणे कुपोषणमुक्त करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून,राजुरा विधानसभा क्षेत्रातील चारही तालुके कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, “बाळू फाउंडेशन करत असलेले कुपोषण निर्मूलनाचे काम हे खऱ्या अर्थाने ईश्वरीय कार्य आहे. या पवित्र कार्यात आणि बाळू फाउंडेशनच्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे उभा राहीन.” माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा आपले वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवूनच साजरे करावे. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी भाजप कार्यकर्ते मयुर बोंगीरवार यांनीही आपल्याकडून संपूर्ण सहकार्याची तयारी दर्शवली.
‘बाळू भेट’ कार्यक्रमासाठी लाभार्थी कुपोषित बालकांचे पालक, संबंधित अंगणवाडी सेविका आणि सुपरवायझर मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार देवराव भोंगळे , अर्चना देवराव भोंगळे, वेकोली व्यवस्थापक बल्लारपूर क्षेत्र ठाकरे साहेब, बाळू फाउंडेशनचे अध्यक्ष अमित महाजनवार, भाजप शहर महामंत्री सचिन भोयर, मिलिंद देशकर, अक्षय सुरतेकर आणि भाजप नेते मयुर बोंगीरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच राजुरा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि पत्रकार बांधवही या उपक्रमाचे साक्षीदार ठरले.
कार्यक्रमाच्या शेवटी बाळू फाउंडेशनचे अध्यक्ष अमित महाजनवार यांनी आमदार देवराव भोंगळे यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल आणि मयुर बोंगीरवार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून कुपोषित बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



