कन्हाळगाव अभयारण्याच्या व्यवस्थापनाची सूत्रे आता ताडोबाकडे!
आठ दिवसांत हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे निर्देश; वन्यजीव संवर्धन आणि पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ चंद्रपूर जिल्ह्यातील वनवैभव आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कन्हाळगाव अभयारण्याच्या व्यवस्थापनाबाबत अखेर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कन्हाळगाव अभयारण्य आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राकडे हस्तांतरित होणार असून, येत्या आठ दिवसांत हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या अभयारण्याच्या व्यवस्थापनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सन २०२१ मध्ये गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगाव येथे अभयारण्याला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, पाच वर्षांचा कालावधी उलटूनही अभयारण्याचा ताबा वनविभागाकडे आला नव्हता. या जंगलाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी वनविकास महामंडळाकडे असल्याने अभयारण्याच्या विकासाला अपेक्षित गती मिळू शकली नाही. परिणामी, अभयारण्याच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनासह वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीनेही अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
दरम्यान, अभयारण्याच्या विविध स्तरांवरून विकासाबाबत मागण्या होत होत्या. काही दिवसांपूर्वी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही अभयारण्य रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, शासनाने आता या व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, कन्हाळगाव अभयारण्याचा ताबा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आठ दिवसांत हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
*वाघांसह दुर्मिळ वन्यजीवांचा अधिवास*
कन्हाळगाव अभयारण्य हे वन्यजीवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. या परिसरात वाघांची लक्षणीय संख्या असून, अनेक दुर्मिळ वन्यप्राण्यांचेही वास्तव्य आहे. ताडोबा, इंद्रावती आणि कावल या महत्त्वाच्या वन्यजीव प्रकल्पांना जोडणारा हा परिसर असल्याने वन्यजीवांच्या मुक्त संचारासाठी त्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या अभयारण्याचे योग्य व्यवस्थापन झाल्यास वन्यजीव संवर्धनाला मोठी चालना मिळू शकते.
*व्यवस्थापनातील बदलामुळे विकासाला गती मिळणार?*
वनविकास महामंडळाकडून अभयारण्याचे व्यवस्थापन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे आल्यानंतर वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, अधिवास विकास आणि पर्यटन नियोजनाला अधिक शिस्तबद्ध स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या व्यवस्थापन प्रक्रियेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे
*वनसंपदा संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल*
कन्हाळगाव अभयारण्याच्या हस्तांतरणाचा निर्णय हा केवळ प्रशासकीय बदल नसून, गोंडपिपरी तालुक्याच्या वनसंपदेच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते आणि अभयारण्याच्या विकासासाठी कोणते ठोस उपाययोजना राबविल्या जातात, याकडे वन्यजीवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.



