ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रुग्णसेवेतच आयुष्याचे खरे समाधान – माजी आ. सुभाष धोटे

कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग येथे निरोप समारंभ उत्साहात ; चार वर्षांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण निरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ शिक्षणातून मिळविलेले ज्ञान आणि कौशल्य हे केवळ स्वतःच्या करिअरपुरते मर्यादित न ठेवता समाजाच्या सेवेसाठी उपयोगात आणावे. विशेषतः आरोग्य क्षेत्रात रुग्णसेवा ही केवळ व्यावसायिक जबाबदारी नसून मानवतेची आणि सामाजिक बांधिलकीची सेवा आहे. रुग्णांप्रती संवेदनशीलता, सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समर्पणाची भावना जोपासून रुग्णसेवेच्या माध्यमातून यशस्वी व्हा, असे प्रेरणादायी प्रतिपादन माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले.

        इन्फंट जिजस सोसायटी, राजुरा द्वारा संचालित कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२०२६ मधील बी.एस्सी. नर्सिंगच्या आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुभाष धोटे, तर विशेष अतिथी म्हणून इन्फंट जिजस सोसायटीचे अध्यक्ष अभिजित धोटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष शिंदे होते.

       कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्राचार्य संतोष शिंदे यांनी प्रास्ताविकातून नर्सिंग शिक्षणाचे महत्त्व विशद करताना परिचारिका हा व्यवसाय केवळ रोजगाराचे साधन नसून रुग्णांच्या वेदना समजून घेत त्यांना आधार देणारी एक पवित्र समाजसेवा असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे सुभाष धोटे यांनी विद्यार्थ्यांच्या चार वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. आरोग्य व्यवस्थेमध्ये डॉक्टरांइतकीच परिचारिका आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत त्यांची सेवा, काळजी आणि आपुलकी रुग्णांना मानसिक बळ देणारी ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानासोबतच माणुसकी, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा जपावी, असे त्यांनी सांगितले. अभिजित धोटे यांनीही विद्यार्थ्यांना व्यावसायिक जीवनात प्रामाणिकपणे कार्य करून यशाची नवी शिखरे गाठण्याचे आवाहन केले.

        यावेळी २०२२-२०२६ बॅचच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील चार वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीतील अनुभव, आठवणी आणि शिक्षकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कनिष्ठ विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्या वरिष्ठ विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप दिला. आनंद, आठवणी आणि भावनिक क्षणांनी हा समारंभ संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये