ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तीन वर्षे आठ महिन्यांत भद्रावतीला नऊ तहसीलदार

महसूल प्रशासनाचा ‘म्युझिकल चेअर’ खेळ, विकास मात्र ठप्प

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ तहसीलदारांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे भद्रावती तालुक्याच्या महसूल प्रशासनाची अवस्था ‘आज कोण, उद्या कोण?’ अशी झाली आहे. अवघ्या तीन वर्षे आठ महिन्यांच्या कालावधीत तब्बल नऊ तहसीलदारांनी येथे कारभार सांभाळल्याने प्रशासनातील सातत्याचा अभाव निर्माण झाला आहे. अधिकारी बदलत गेले; मात्र महसूल प्रकरणांच्या फाईली आणि नागरिकांच्या समस्या जागच्या जागीच राहिल्याची नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी तालुक्याच्या विकासकामांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

राजकीय दबावाच्या चर्चेपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या मालिकेपर्यंत

७ जानेवारी २०२२ रोजी अनिकेत सोनवणे यांनी भद्रावती तहसीलदारपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांचा कार्यकाळ सुरू असतानाच त्यांची बदली झाल्यानंतर नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्याकडे प्रभारी कारभार सोपविण्यात आला.

यानंतर राजेश भांडारकर पूर्णवेळ तहसीलदार म्हणून रुजू झाले. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत कर्मचारी व नागरिकांकडून वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान, शेतकरी परमेश्वर मेश्राम यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भांडारकर निलंबित झाले. त्यांच्या अनुपस्थितीत परीक्षाविधीन उपजिल्हाधिकारी बालाजी कदम यांच्याकडे तहसीलदारपदाचा कार्यभार सोपविण्यात आला. प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कदम यांचीही भद्रावतीतून बदली झाली.

यानंतर चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार संदीप पानमंद यांच्याकडे भद्रावतीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. दरम्यान, भांडारकर यांना निलंबनाविरोधात न्यायालयीन दिलासा मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा पदभार स्वीकारला. मात्र, मेश्राम आत्महत्या प्रकरणात मृतकाच्या पत्नीने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पुन्हा अडचणीत आले.

पुन्हा प्रभारी कारभाराची वेळ

यानंतर रिक्त झालेल्या पदावर चंद्रपूर येथून सीमा गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, भद्रावतीतील कामाच्या ताणामुळे त्या आजारी पडल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर १ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यालयातील तहसीलदार मधुकर काळे यांच्याकडे तहसीलदारपदाचा कार्यभार सोपविण्यात आला.

काळे यांच्याकडे कारभार आल्यानंतर महसूल प्रशासनाचा गाडा रुळावर येईल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, अवघ्या पंधरा दिवसांतच पुन्हा बदल झाला. १६ ऑगस्ट रोजी चंद्रपूरचे संदीप पानमंद यांच्याकडे पुन्हा तहसीलदारपदाचा कार्यभार सोपविण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तहसीलदार बदलत गेले; फाईली मात्र जागच्या जागी!

तहसीलदार बदलल्यानंतर नवीन अधिकाऱ्याला तालुक्यातील प्रलंबित महसूल प्रकरणे, जमीनविषयक बाबी, फेरफार नोंदी, वारस नोंदी, प्रमाणपत्रे आणि इतर प्रशासकीय विषय समजून घेण्यासाठी वेळ लागतो. अधिकारी प्रशासनाशी परिचित होत असतानाच पुन्हा बदल होत असल्याने निर्णयप्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

‘अधिकारी बदला, फाईल तिथेच ठेवा’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना मात्र आपल्या कामासाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

विकासकामांसाठी स्थिर नेतृत्वाची गरज

तहसीलदार हे तालुक्याच्या महसूल प्रशासनातील महत्त्वाचे पद आहे. नैसर्गिक आपत्ती, शेतकरी प्रश्न, जमीनविषयक प्रकरणे, शासकीय योजना, निवडणूक प्रक्रिया, कायदा-सुव्यवस्था आणि विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या तहसीलदारांच्या अखत्यारित येतात. त्यामुळे या पदावर वारंवार बदल झाल्यास प्रशासनातील सातत्य आणि निर्णयक्षमता प्रभावित होण्याची शक्यता आहे.

भद्रावतीसारख्या मोठ्या तालुक्याला प्रभारी अथवा अल्पकालीन स्वरूपातील अधिकाऱ्यांऐवजी अनुभवी आणि पूर्णवेळ तहसीलदाराची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

‘तात्पुरता नव्हे, पूर्णवेळ तहसीलदार द्या!’

भद्रावती तहसील कार्यालयाला वारंवार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर ठेवण्याऐवजी अनुभवी अधिकाऱ्याची पूर्णवेळ नियुक्ती करून त्यांना स्थिर कार्यकाळ द्यावा, अशी मागणी होत आहे. तहसीलदारांच्या या ‘म्युझिकल चेअर’ला पूर्णविराम मिळाल्यास महसूल प्रशासनाला स्थैर्य मिळेल आणि रखडलेली नागरिकांची कामे मार्गी लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आता प्रश्न ‘भद्रावतीला पुढचा तहसीलदार कधी मिळणार?’ हा नसून, ‘एका तहसीलदाराला काम करण्याची संधी अखेर किती दिवस मिळणार?’ हा आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये