ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोदेपूरमध्ये पारंपरिक मूळनिवासी ग्रामसभा व महाराणी दुर्गावती जयंती उत्साहात साजरी

१५ गावांतील मूळनिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग; महिला सशक्तीकरण, दारूबंदी व ग्रामस्वच्छतेचा सामूहिक निर्धार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- पारंपरिक रूढी, संस्कृती आणि सामाजिक एकजुटीचे दर्शन घडवत कोदेपूर येथे पारंपरिक मूळनिवासी ग्रामसभा आणि वीरांगना महाराणी दुर्गावती जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या उपक्रमात परिसरातील सुमारे १५ गावांतील मूळनिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. महिला सशक्तीकरण, दारूबंदी, ग्रामस्वच्छता आणि सामाजिक एकोपा यांसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प यावेळी करण्यात आला.

पारंपरिक मूळनिवासी ग्रामसभेच्या ठरावानुसार, ४ ऑक्टोबर रोजी शेडमाके गुडा, जंगू गुडा आणि कोदेपूर या तीन गुड्यांच्या संयुक्त निमंत्रणातून पारंपरिक ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पारंपरिक ग्रामसभा व्यवस्था अधिक बळकट करणे, सामाजिक प्रश्नांवर एकत्रितपणे मार्ग काढणे, महिला सशक्तीकरण, गावातील दारूबंदी, स्वच्छता आणि गावांच्या सर्वांगीण विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी लिंगोराव सोयाम, शित्रु गेडाम आणि संतोषजी सलाम यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचा सक्रिय सहभाग आवश्यक असून, दारूबंदी आणि ग्रामस्वच्छता यांसारख्या विषयांवर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सामाजिक एकजूट आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेतून गावांचा विकास साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ग्रामसभेला शंकर वेट्टी, केशव कोटनाके, बापुराव जुमनाके, चैनराव मडावी, तुकाराम धुर्वे, गंगू गेडाम, हनुमंतू कुमरे, सरपंच गंगाधर आत्राम, लच्चू वल्का यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

महाराणी दुर्गावतींच्या शौर्याला अभिवादन

५ ऑक्टोबर रोजी वीरांगना महाराणी दुर्गावती जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. महाराणी दुर्गावती यांच्या अतुलनीय शौर्य, स्वाभिमान, त्याग आणि समाजासाठीच्या योगदानाचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले. त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेत समाजाने एकजुटीने पुढे जाण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमाला बाजीराव पा. वलका, लिंबाराव पा. वलका, आनंदराव पा. शेडमाके आणि भोजु पा. आत्राम उपस्थित होते. तसेच लता बाजीराव वलका, जंगुबाई आनंदराव शेडमाके, नागुबाई वलका यांच्यासह महिला व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला

तीन गुड्यांच्या ग्रामस्थांकडून स्वच्छता अभियान

जयंती कार्यक्रमानंतर शेडमाके गुडा, जंगू गुडा आणि कोदेपूर येथील ग्रामस्थांनी एकत्र येत संयुक्त ग्रामस्वच्छता मोहीम राबविली. गाव परिसरातील स्वच्छता करून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गाव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. विशेष म्हणजे, या उपक्रमात महिला आणि पुरुषांनी एकत्रित सहभाग नोंदवून सामूहिक श्रमदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये