“सायबर क्राइम” फसवणुकीवर पोलीस विभागाची जनजागृती
"एक चूक ठरू शकते महागात"चा संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करताना सतर्क राहून कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, तसेच रस्त्यावर वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असा महत्त्वपूर्ण संदेश पोलिस विभागाच्या जनजागृती कार्यक्रमातून देण्यात आला.
गोंडपिपरी शहरातील लक्ष्मणराव कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालयात पोलिस विभागाच्या वतीने सायबर सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते बाळू निमगडे यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले.
‘अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा, ओटीपी कोणालाही सांगू नका आणि सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करू नका,’ असे सांगत निमगडे यांनी विद्यार्थ्यांना सायबर फसवणुकीचे विविध प्रकार समजावून सांगितले. छोट्याशा चुकीमुळे आर्थिक तसेच मानसिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने डिजिटल जगात जबाबदारीने वागणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अल्पवयीन विद्यार्थ्यांनी वाहन चालवू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, वेगावर नियंत्रण ठेवावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पीएसआय विशाल टेकाम यांनी केले.
दरम्यान, व्यासपीठावर लक्ष्मणराव कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक अजय माडुरवार,पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. माडुरवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर गुन्हे आणि रस्ते सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकवृंद उपस्थित होते.सायबर जागरूकता आणि वाहतूक नियमांबाबत शिस्त निर्माण करण्याचा संदेश देत हा जनजागृती कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरला.



