ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षकांच्या कमतरतेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात..!

गोंडपिपरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थीसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करण्याची मागणी; _तालुका काँग्रेसचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थीसंख्या, वर्गसंख्या आणि विषयांची गरज लक्षात घेऊन तातडीने पुरेसे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर यांना गट विकास अधिकारी यांच्या मार्फतीने सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गोंडपिपरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत शिक्षकांची कमतरता असून, उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त वर्ग आणि विषयांचा भार पडत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे नियमित व दर्जेदार अध्यापन मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीसंख्या, वर्गसंख्या व विषयांची आवश्यकता यानुसार शिक्षक उपलब्धतेचे फेरसर्वेक्षण करावे, रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत तसेच शिक्षक_विद्यार्थी प्रमाण योग्य राखून प्रत्येक वर्गासाठी आवश्यक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषतः गणित, विज्ञान आणि इंग्रजी यांसारख्या महत्वाच्या विषयांसाठी आवश्यक शिक्षकांची उपलब्धता सुनिश्चित करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून, प्रशासनाने तातडीने शिक्षक उपलब्ध करून शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनकर्त्यांमध्ये तालुकाध्यक्ष अशोक रेचणकर, अनुसूचित जाती प्रदेश सचिव ॲड. सचिन फुलझेले, शहराध्यक्ष राजू झाडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विपिन पेदूलवार, अनुसूचित जाती सेल तालुकाध्यक्ष सारनाथ बक्षी, प्रा. शंभुजी येलेकर, नगरसेविका वनिता वाघाडे, राजू राऊत, सोशल मीडिया विभाग प्रमुख राजेश डोंगरे, आशिष निमगडे, शेषराव बट्टे, जंपलवार यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

*शिक्षकांवरील अतिरिक्त प्रशासकीय भार काढावा*

शिक्षकांवर सोपविण्यात येणाऱ्या अतिरिक्त प्रशासकीय कामांचा अनावश्यक भार कमी करावा. शिक्षकांच्या कमतरतेमुळे ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्या शाळांसाठी विशेष शैक्षणिक उपाययोजना राबवाव्यात. शाळनिहाय उपलब्ध व रिक्त पदांची माहिती सार्वजनिक करून त्यावर तातडीने कार्यवाही करावी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये