करंजीत तंटामुक्त समितीच्या निवडणुकीत निमगडे गटाचा वरचष्मा, रघु मोहूर्ले विजयी
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी राजकीय शक्तिप्रदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या तसेच तंटामुक्त गावासाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करंजी गावात बुधवारी (दि. १९) तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच रंगली. तंटामुक्त समितीची निवडणूक पक्षीय चिन्हावर होत नसली, तरी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला राजकीय रंग चढल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ही निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीची ‘रंगीत तालीम’ ठरल्याची चर्चा गावात सुरू आहे.
तंटामुक्त गाव समितीच्या निवडणुकीत कमलेश निमगडे यांच्या गटाकडून रघु मोहूर्ले, तर दुसऱ्या गटाकडून झाराबाई चांदेकर यांना उमेदवारी देण्यात आली. दोन्ही गटांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने सकाळपासूनच गावातील राजकीय वातावरणात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. ग्रामसभेत तब्बल ८०५ ग्रामस्थ उपस्थित होते. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत रघु मोहूर्ले यांना ४२५ मते, तर झाराबाई चांदेकर यांना ३८० मते मिळाली. त्यामुळे रघु मोहूर्ले यांनी ४५ मतांनी विजय मिळवत निमगडे गटाचा वरचष्मा सिद्ध केला.
करंजी ग्रामपंचायतीची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीची निवडणूक दोन्ही गटांसाठी महत्त्वाची मानली जात होती. तंटामुक्त समितीच्या निवडणुकीला पक्षीय स्वरूप नसले तरी गावातील राजकीय नेतृत्व आपापल्या गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याने निवडणुकीत प्रत्यक्षात गटबाजीचे चित्र दिसून आले.
या निवडणुकीत दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी करण्यात आल्याची चर्चा होती. साम, दाम, दंड, भेद या राजकीय डावपेचांचा वापर झाल्याचीही गावात चर्चा रंगली. निवडणुकीच्या निकालानंतर निमगडे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कमलेश निमगडे यांच्या नेतृत्वाखालील गटाची ग्रामपंचायतीवर सत्ता असल्याचे सांगितले जाते. यापूर्वीही त्यांच्या गटाकडून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निवडून आल्याचे चित्र राहिले आहे. त्यामुळे यावेळीही रघु मोहूर्ले यांच्या विजयामुळे निमगडे गटाची गावातील संघटनात्मक ताकद कायम असल्याचा दावा समर्थकांकडून केला जात आहे.
रघु मोहूर्ले यांना मिळालेली ४२५ मते ही आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने निमगडे गटासाठी महत्त्वाची मानली जात आहेत. दुसरीकडे झाराबाई चांदेकर यांना ३८० मते मिळाले त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रदीप खोब्रागडे यांच्या गटांमध्ये काटे की टक्कर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तंटामुक्त समितीच्या निवडणुकीत ८०५ ग्रामस्थांची उपस्थिती आणि दोन्ही उमेदवारांना मिळालेली मते यामुळे निकालाची गावात जोरदार चर्चा सुरू आहे. रघु मोहूर्ले यांनी ४५ मतांची आघाडी घेतल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीतही निमगडे गटाला याचा फायदा होईल का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तंटामुक्त समितीच्या निवडणुकीत निमगडे गटाला मिळालेला विजय आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत कितपत निर्णायक ठरतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र, बुधवारी झालेल्या निवडणुकीनंतर करंजीतील राजकीय वातावरण आणखी तापले असून दोन्ही गटांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र आहे.



