महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावली येथील महिला तक्रार निवारण समिती यांच्या वतीने समितीच्या सदस्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. धनंजय आंबटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम २०१३ (POSH Act), तक्रार निवारण समितीची भूमिका, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, गोपनीयतेचे महत्त्व तसेच समिती सदस्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा डॉ. किरण रामराव बोरकर यांनी केले. त्यांनी समितीच्या कार्याचा उद्देश, महिलांसाठी सुरक्षित, सन्मानपूर्ण व समताधिष्ठित वातावरण निर्माण करण्याची गरज आणि अशा प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.ए.चंद्रमौली यांनी महिला सक्षमीकरण,संवेदनशीलता आणि कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समिती सदस्यांनी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. उपस्थित प्रतिनिधी व मान्यवरांचे आभार प्रा.स्मिता राऊत यांनी केले.
कार्यशाळेत समिती सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रश्नोत्तर सत्रातून विविध शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमामुळे महिला तक्रार निवारण समितीचे कार्य अधिक प्रभावी व सक्षम होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



