निफंद्रा येथील शेतकरी कुटुंबाच्या घराला भीषण आग
संसारोपयोगी साहित्य भस्मसात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ दि. २५ जानेवारीला सकाळी 9.00 वाजेच्या सुमारास सावली तालुक्यातील निफंद्र येथील गरीब शेतकरी दिनेश बोरेकर यांच्या घराला अचानक आग लागून संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कुटुंब उघड्यावर पडले आहे.
आगीत घरातील टेबल, खुर्ची, पंखा, कूलर, दिवान, गाद्या, खाटा, तेल, तिखट, हळद, तांदूळ, कपडे यांसह दैनंदिन वापराच्या सर्व वस्तू भस्मसात झाल्या. कुटुंबाच्या अंगावरील कपड्यांशिवाय काहीही शिल्लक राहिले नाही. घरात ठेवलेली 20,000/- रुपयांची रोख रक्कमही आगीत जळून गेली. त्यामुळे या शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसराचे माजी संचालक तथा विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. खुशाल लोडे आणि निफंद्राचे सरपंच श्री. पुरुषोत्तम पाटील नवघडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यांनी नुकसानग्रस्त बोरेकर कुटुंबाला धीर दिला आणि प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी केली.
सदर आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
या गरीब कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर मदत, आर्थिक सहाय्य व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी माजी संचालक तथा अध्यक्ष खुशाल लोडे, सरपंच पुरुषोत्तम नवघडे आणि ग्रामस्थांनी केली आहे.



