समुद्रपूर पोलिसांची कारवाई : 72 विदेशी दारूच्या बाटल्या व दुचाकीसह एकाला अटक
समुद्रपूर पोलिसांनी 1 लाख 26 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून सुमारे 1 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 25 जून 2026 रोजी नाकाबंदी व प्रो-रेड कारवाईदरम्यान सम्यक विश्वनाथ पाटील (वय 25, रा. समुद्रपूर) हा विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडून 90 हजार रुपये किंमतीची एक विनाक्रमांकाची ॲक्टिव्हा मोपेड तसेच रॉयल चॅलेंज कंपनीच्या 72 विदेशी दारूच्या बाटल्या (प्रति बाटली 500 रुपये, एकूण किंमत 36 हजार रुपये) असा एकूण 1 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान आरोपीने हा माल संदेश मेश्राम याच्या असून तो साहिल डूमार यांच्या सांगण्यावरून आपल्या घरी आणल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम 65(अ), 65(ई), 77(अ), 83 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 3(1), 181, 130 आणि 177 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.समुद्रपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.



