सेवाग्राम पोलीसांची “वॉशआऊट” मोहीम
गुन्ह्यांत 6 लाख 86 हजारावर मुद्देमाल नष्ट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी सेवाग्राम पोलीसांनी आज दि. 20/06/2026 रोजी एक भव्य आणि अत्यंत नियोजनबद्ध वॉश-आऊट” मोहीम यशस्वीरित्या राबविली. या धडक कारवाईत पोलीस स्टेशन, सेवाग्राम येथे एकूण 03 गुन्हे दाखल करण्यात येवुन 04 आरोपीतावर कारवाई करुन सुमारे 6,86,800/- रुपयांचा दारूसाठा नष्ट करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन, सेवाग्राम हद्दीतील मदणी, म्हसाळा, बरबडी येथे अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर गावठी मोहा दारू गाळून ती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती सेवाग्राम पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मदणी, म्हसाळा, बरबडी या ठिकाणी 03 पथक तयार करुन लक्ष केंद्रित करून पाळत ठेवण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल वर्धा यांच्या नेतृत्वाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, वर्धा, उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन, सेवाग्राम चे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांचे निर्देशावरून त्यांच्या अधिनस्त पोलीस अंमलदार व प्रत्यक्ष पंचानी सकाळी 05/30 वाजल्यापासून या सर्व गावठी दारूभट्टीच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत आरोपी क्र. 1) अवचित मोरोतराव तेलंगे, 2) निलेश उत्तमराव कौरती, दोन्हा रा. मदणी 3) शैलेश माटे, रा. नागसेन नगर, नालवाडी, वर्धा, 4) सुधाकर चितांमण लेंडे, रा. बरबडी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच या मोहीमेत नवीन कायद्यानुसार ‘ई’ साक्ष ॲप्लिकेशन (E-Sakshya Application) चा वापर करून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले.
सदरची कारवाई पो. स्टे. सेवाग्रामचे पोलीस अंमलदार पो. उप. नि. वाल्मीक बांबर्डे, स. फौ. मारोती कातकर, पो. हवा. सचिन सोनटक्के, किशोर पेटकुले, मनोज वाघमारे, धिरज मिसाळ तसेच होमगार्ड सैनिक यांनी केली.
भविष्यातील कठोर कारवाईचे संकेत या अचानक केलेल्या ‘वॉश-आऊट’ मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये, म्हणून अशा प्रकारची अचानक कारवाई (वॉशआऊट मोहीम) करण्यात आली आहे.
मा. जनसंपर्क अधिकारी सा.
पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा यांना सविनय सादर…….
(नागेशकुमार चतरकर) पो. नि. पोलीस स्टेशन, सेवाग्राम



