ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिवरा येथील शेकडो खताच्या बॅग रातोरात लंपास

बळीराजाच्या स्वप्नांवर खत चोरांचा डल्ला ; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील तेलंगणा राज्य मार्गावरील मौजा हिवरा येथील धाबा शिवार परिसरात आज मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात खत चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवारातील अनेक शेतांपर्यंत रस्त्यांची सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी पेरणीचे नियोजन करून आवश्यक तेवढे खत आधीच शेतामध्ये नेऊन साठवून ठेवले होते. मात्र याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात धाडसी चोरी केली.

प्राथमिक माहितीनुसार, हिवरा येथील संतोष पुलगमकर, मुरलीधर विरुडकर, गंगाधर विरुडकर, दिवाकर अक्केवार, सेवानंद अक्केवार, देवानंद अक्केवार, मंगेश बल्की या कास्तकारांच्या शेतातून अंदाजे शंभर खताच्या बॅगा चोरीला गेल्याची चर्चा गावभर पसरली. सकाळी शेतकरी शेतात पोहोचल्यानंतर खताचा साठा गायब असल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पेरणीच्या तोंडावर झालेल्या या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक अडचणीत टाकणाऱ्या चोरट्यांना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.

परिसरातील खत चोरीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना असून शेतकऱ्यांनी धाबा पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सध्यातरी खत चोरांचा तपास सुरू असून, सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती धाबा पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांनी दिली आहे.काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये