ताज्या घडामोडी

शाळेतील कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी शिक्षकांच्या मदतीला “एआय साथी”ची साथ

शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाची नवी क्रांती ; ऑनलाईन प्रशिक्षणातून शिक्षकांचे अध्यापन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

शिक्षण क्षेत्रात वेगाने होत असलेल्या डिजिटल परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षकही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने अध्यापनासाठी सज्ज होणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी)ने शिक्षकांना एआय तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी ‘एआय साथी’ हा विशेष ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला असून, या उपक्रमामुळे शिक्षकांचे अध्यापन अधिक परिणामकारक, विद्यार्थीकेंद्रित आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

एनसीईआरटीने विकसित केलेला हा अभ्यासक्रम ‘दीक्षा’ पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. देशभरातील पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच शैक्षणिक अधिकाऱ्यांना या प्रशिक्षणात सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

सुमारे चार तासांच्या या ऑनलाइन अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्तेची मूलभूत माहिती, तिचा सुरक्षित आणि जबाबदार वापर, अध्यापनाचे नियोजन, शैक्षणिक साहित्य तयार करणे, प्रश्नपत्रिका व उपक्रमांची निर्मिती, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन, तसेच शालेय प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम करण्यासाठी एआयचा वापर कसा करावा, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मोबाईल, टॅब किंवा संगणकाच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाला (सीपीडी) प्राधान्य देण्यात आले आहे. दरवर्षी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, बदलत्या तंत्रज्ञानाशी शिक्षकांना जोडून त्यांची अध्यापन कौशल्ये अधिक सक्षम करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

“एआय साथी” शिक्षकांसाठी सक्षम सहाय्यक

शिक्षणतज्ज्ञांच्या मते, एआय शिक्षकांची जागा घेण्यासाठी नसून शिक्षकांना अधिक सक्षम सहाय्यक म्हणून काम करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार अध्यापन करणे, कमी वेळेत दर्जेदार शैक्षणिक साहित्य तयार करणे, नव्या पद्धतीने शिकविणे आणि शिक्षण अधिक रंजक बनविणे शक्य होणार आहे. शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर लक्षात घेता, भविष्यातील वर्गखोली अधिक स्मार्ट, डिजिटल आणि विद्यार्थीकेंद्रित होण्याचे संकेत मिळत आहेत. खडू-फळ्यापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतचा शिक्षकांचा प्रवास आता प्रत्यक्षात सुरू झाला असून, शिक्षणाच्या नव्या युगाची ही महत्त्वपूर्ण सुरुवात मानली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये