ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणुकीचा प्रयत्न?

'यादीत नाव टाकतो' म्हणत आधार कार्ड व पैशांची मागणी; सामाजिक कार्यकर्त्यांची एसबीआय व्यवस्थापकांकडे धाव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पार्श्वभूमीवर जिवती तालुक्यात काही कथित दलालांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गावोगावी फिरून अशिक्षित व भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांना लक्ष्य करत, “तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट करून देतो,” असे आमिष दाखवून आधार कार्ड, कागदपत्रे आणि पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकाराची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते शब्बीर जागीरदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष आरिफ शेख डोंगरे, मनसेचे तालुकाप्रमुख हकानी शेख, सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख तसेच काही शेतकरी यांनी मंगळवारी भारतीय स्टेट बँक, पाटण शाखेचे व्यवस्थापक महेश नेवारे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती दिली व शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली.

यावेळी शाखा व्यवस्थापक महेश नेवारे यांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीने आधार कार्ड, इतर कागदपत्रे किंवा पैसे मागितल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, तसेच अशा प्रकारांची तात्काळ बँक प्रशासन किंवा संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने अशा दलालांवर कठोर कारवाई करावी, तसेच कर्जमाफी योजनेबाबत गावपातळीवर जनजागृती करून शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय शासकीय योजनेचा लाभ मिळेल, यासाठी प्रभावी मोहीम राबवावी, अशी मागणी केली.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन

कर्जमाफीच्या नावाखाली कोणीही पैसे, आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांची मागणी करत असेल तर त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. कोणत्याही दलालाला पैसे किंवा कागदपत्रे देऊ नका. संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ भारतीय स्टेट बँक, पाटण शाखा किंवा संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करा.
                 — महेश नेवारे, शाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, पाटण शाखा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये