ताज्या घडामोडी

जिल्हाधिका-यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

नागभीड तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी मंगळवारी (दि. 4) नागभीड तहसील कार्यालयास भेट देऊन महसूल विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या सोडविण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

याप्रसंगी जिल्हाधिका-यांनी,  विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वेळेत व सुलभ पद्धतीने मिळावीत, यासाठी आवश्यक सुधारणा व उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. नागरिकांना शासकीय सेवा अधिक कार्यक्षम व गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला. जमिनीच्या डिजिटायझेशनबाबत ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून कामाची गती वाढविणे, नोंदी अचूक ठेवणे व पारदर्शकता राखणे, तसेच नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.

विविध विकासकामांची पाहणी : जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय धान्य गोदाम, नवीन तहसील कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी करून दर्जेदार व विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. याशिवाय, नगर परिषद नागभीड अंतर्गत सुरू असलेल्या “नमो उद्यान” प्रकल्पास भेट देऊन कामाची पाहणी केली. तसेच त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

दौ-याप्रसंगी प्रभारी तहसीलदार उमेश कावळे, अपर तहसीलदार शेखर पुणसे, नायब तहसीलदार नरेश बोधे व स्मिता भैसारे, गट विकास अधिकारी स्नेहल लाड, नगर परिषद मुख्याधिकारी सोनम देशमुख, उपअधीक्षक भूमी अभिलेख वंदना नाईक, तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी, उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल गव्हारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर, निरीक्षण अधिकारी चांदेकर, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे आदी अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये