कायद्याचा अभ्यास देणारे शिक्षक हे समाजाचे दिपस्तंभ आहेत – न्यायमूर्ती आदित्य चव्हाण
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयातर्फे सावली रत्न पुरस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ . शेखर प्यारमवार
सार्वजनिक जीवन जगतांना कायदयाचा अभ्यास आवश्यक असुन अभ्यास करवुन घेणारे शिक्षक हे समाजाचे दीपस्तंभ असतात. प्रदीर्घ, निष्ठावान आणि प्रेरणादायी सेवा करतांना ते स्वतः जळुन इतरांचे आयुष्य उजळवत असतात. असे मत न्यायमुर्ती आदित्य चव्हाण यांनी व्यक्त केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सावलीच्या वतीने संपन्न झालेल्या सावली रत्न पुरस्कार सोहळयात ते बोलत होते. भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे कोषाध्यक्ष डाॅ. विजय शेंडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास सावली न्यायालयाचे प्रथम श्रेणी दिवाणी न्यायाधिश आदित्य अजय चव्हाण, सत्कारमुर्ती जोगेश्वर पाल, बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट धनंजय आंबटकर, महात्मा गांधी विचार मंचाचे सुधाकर गाडेवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज बोम्मावार आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्व. वामनरावजी गड्डमवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करून वंदेमातरम गीताने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. चंद्रमौली यांनी प्रास्ताविक तर गौरवपत्राचे वाचन डाॅ. संदीप देशमुख हयांनी केले. कार्यक्रमात शिक्षक म्हणुन प्रदिर्घ सेवा बजावणारे सावली तालुक्यातील विविध सामाजीक चळवळीतील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक जोगेश्वर पाल हयांचा मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देवुन गौरव करण्यांत आला.
सत्कारा दाखल मनोगत व्यक्त करतांना जोगेश्वर पाल हयांनी हा सन्मान आपल्या आज पर्यंतच्या सेवा, कष्टाचा आणि समाजाच्या विश्वासाचा असुन सध्यास्थितीत समाजाची मानसिकता बदलत असल्याने चिंता व्यक्त केली. न्यायमुर्ती आदित्य चव्हाण हयांनी विद्यार्थ्यानी ज्ञानासोबतच संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. विजयराव शेंडे हयांनी ज्येष्ठ नागरीक ही देशाची संपत्ती असुन समाजात गुरुंचे स्थान अमुल्य आहे. शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून संस्कारांचा शिल्पकार आणि राष्ट्रनिर्मितीचा खरा आधारस्तंभ असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन डाॅ. संगानंद बागडे हयांनी तर उपस्थितांचे आभार डाॅ. संदीप देशमुख हयांनी मानले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला अविनाश पाल यांचेसह शहरातील नागरीक, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येनी होते.



