३५ गोवंशाची अमानुष वाहतूक : नाकाबंदीला नजुमानता ट्रक पळवला
पाठलाग करून एलसीबीची मोठी कारवाई : २२ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), चंद्रपूर यांनी गुप्त माहितीच्या आधारे भद्रावती परिसरात गोवंशांची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई करत तब्बल ३५ गोवंशांची सुटका केली. या कारवाईत ₹२२.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी एलसीबीला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पडोली पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी एमएच-३१/सीव्ही-०८१७ क्रमांकाचा १० चाकी टाटा ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रक न थांबवता भद्रावतीच्या दिशेने वेगाने पळ काढला. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने तात्काळ पाठलाग करून सब स्टेशन, पावर ग्रीड, जुना सुमठाणा, भद्रावती येथे ट्रक ताब्यात घेतला.
तपासणीदरम्यान ट्रकमध्ये ३१ गायी व ४ बैल असे एकूण ३५ गोवंश कोंबून अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान चालक व क्लिनरला ताब्यात घेण्यात आले
भुषण ओमकार तरारे (वय २४), रा. आजादनगर, कामठी, नागपूर. सैय्यद जसीन सैय्यद असलम (वय ३३), रा. ताजबाग चौक, नागपूर या आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर आरोपी राकेशकुमार यादवराम टेकाम व नामे मोसिन दोघे फरार असून सदर कार्यवाहीत १० चाकी टाटा ट्रक (क्र. MH-31/CV-0817) – किंमत ₹१५ लाख ३५ गोवंश (३१ गायी व ४ बैल) – किंमत ₹७ लाख २ मोबाईल हँडसेट – किंमत ₹३५ हजार असा एकूण ₹२२.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ तसेच बीएनएस, २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात एलसीबी उपविभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



