झाडीबोली साहित्य मंडळातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी संपन्न
राष्ट्रसंत साहित्यावर आधारित काव्यरचनेचे सादरीकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री गुरुदेव सेवा मंडळ प्रणित राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर शाखेच्या वतीने लक्ष्मीनगर धनोजे कुणबी समाज मंदिर सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ वी पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प. चे माजी मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीधर मालेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . यावेळी नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, धम्ममित्र नामदेव गेडकर, डॉ. विजय हेलवटे, ज्येष्ठ कवी ए. एम. रहिम, धनोजे कुणबी समाज संस्थेचे सचिव अतुल देऊळकर, उपाध्यक्ष संजय ढवस, कोषाध्यक्ष सुधाकर काकडे, संजय वैद्य, प्रा. रवींद्र झाडे, नगरसेविका सौ. मनीषा बोबडे ,नवनाथ डेरकर , गणपत हिंगाणे , पत्रकार प्रभाकर आवारी, नामदेव शिंपी समाजाचे अशोक सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंतांच्या प्रतिमापूजनाने आणि संकल्पगीताने करण्यात आली. यावेळी उद्घाटक श्रीधर मालेकर म्हणाले की, राष्ट्रसंतांनी ग्रामोन्नतीचा मार्ग सांगितला असून त्यांनी दिलेल्या मार्गावर वाटचाल करावी, असे आवाहन केले. प्रमुख अतिथी नायब तहसीलदार श्री.ठाकरे म्हणाले की, राष्ट्रसंतानी जीवन शिक्षणाचा आग्रह धरला होता. त्यामुळे आजच्या युवकांनी आपले ज्ञान केवळ पदवीपर्यंत न ठेवता, कठोर परिश्रमाच्या बळावर जीवनात यश संपादन करावे, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणातून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी राष्ट्रसंताच्या विचारांचा आणि ग्रामगीतेतील मानवतावादी तत्त्वज्ञानाचा उहापोह करत ग्रामविकास, स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, जीवनशिक्षण आणि सामाजिक एकात्मता यावर प्रकाश टाकून राष्ट्रसंतांच्या विचारांची प्रासंगिकता याबाबत विचार प्रकट केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात कवी ए. एम. रहिम , नामदेव गेडकर, प्रा. संगीता मालेकर, प्रा. शुभांगी मोहितकर,सौ. वैजयंती गहूकर आदींनी आपल्या काव्यरचना प्रस्तूत केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय हेलवटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नामदेव मोरे यांनी केले तर आभारप्रदर्शन देवराव कोंडेकर यांनी केले. कार्यक्रमास वसतीगृहातील विद्यार्थी व श्रीगुरुदेव सेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



