माणिक कुटी भवनात दिवाळीनिमित्त श्रीगुरुदेव भजन पहाट संपन्न : राणी हिराई भजन मंडळ सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
चंद्रपूर :_ राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने दिवाळीनिमित्त महाकाली नगरी देवाडा येथील माणिक कुटी भवनात श्रीगुरुदेव भजन पहाट कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. ब्रम्हमुहूर्तावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित राष्ट्रीय भजनांचे प्रभावी गायन बंडू टेकाम गुरूजी, संजय बोढाले,सौ. शारदा निकुरे,
सौ.मंगला झिलपे ,सौ. कविता टेकाम ,कु. तनिष्का टेकाम ,श्री. भास्कर निंबाळकर,आयुष चहारे, रघुनाथ निमकर ,हरिश्चंद्र निकुरे, साहस बिसेन, अशोक सातपुते आदींनी करत वातावरण गुरूदेवमय केले. ‘ गुरूदेव दया कर दे , आता वाजला रे डंका घेऊ नका शंका, उठा हो दिवस निघाला नवा, निघू दे मंगल दिवस तो, कोण दिवस येई कसा ‘ अशी राष्ट्रसंताची अजरामर गीते उपस्थित श्रोत्यांना ऐकता आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी राणी हिराई गुरुदेव सेवा भजन मंडळ ( स्वावलंबी नगर ) यांच्या जनजागृतीच्या कार्याबद्दल कौतुक करत संबंधित मंडळास मानवस्त्र व राष्ट्रसंत साहित्य देऊन सन्मानित केले. मंडळाचे वतीने सदर सन्मान बंडू टेकाम गुरूजी यांनी स्विकारला. भजन परंपरेमुळे ग्रामीण भागात आजही लोकशिक्षणाचे प्रभावी कार्य होत असल्याचे प्रतिपादन यावेळी बंडोपंत बोढेकर यांनी केले. याच कार्यक्रमात परिषदेच्या वतीने गडचिरोली येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या सदस्या दिवं. सुमनताई शिवनाथजी कुंभारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन डॉ. धर्मा गांवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. रजनी बोढेकर यांनी केले.



