ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा तालुक्यात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार!

हेटी येथे घराच्या दारात लिंबू, हळद-कुंकू टाकून अघोरी कृत्य; अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रभाकर मुक्के यांनी केले प्रबोधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा :_ तालुक्यातील हेटी येथे आज रात्री अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा धक्कादायक प्रकार समोर आला. गावातील विलासजी पारखी यांच्या घराच्या दरवाजासमोर अज्ञात व्यक्तीने लिंबू ठेवून त्यावर टाचण्या टोचल्या तसेच हळद-कुंकू लावून काही साहित्य ठेवले होते. या प्रकारामुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. प्रभाकरजी मुक्के यांनी तत्काळ पोलीस पाटील यांना कल्पना दिली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली. संबंधित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना या प्रकारामागील अंधश्रद्धेबाबत समजावून सांगण्यात आले.

विशेष म्हणजे, नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसमक्ष लिंबू फोडून त्याचा शरबत तयार करण्यात आला आणि उपस्थित नागरिकांसमोर तो पिऊन दाखविण्यात आला. अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये कोणतीही दैवी शक्ती किंवा चमत्कार नसून हा केवळ अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे प्रबोधनातून स्पष्ट करण्यात आले.

समाजात भीती, गैरसमज आणि दहशत निर्माण करणाऱ्या अशा प्रकारांना बळी पडू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, तसेच अशा घटना घडल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये