ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर बंगळुरू-हझरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या थांब्याबाबत रेल्वेमंत्र्यांचे सकारात्मक पाऊल; खासदार प्रतिभा धानोरकर

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक २२६९१/२२६९२ के.एस.आर. बंगळुरू – हझरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसचा थांबा मंजूर करण्यात यावा, यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या या मागणीची तातडीने दखल घेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या विषयावर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे पत्र पाठवले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी १७ जुलै २०२६ आणि १८ जुलै २०२६ रोजी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून चंद्रपूर आणि परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी राजधानी एक्सप्रेसला चंद्रपूर स्थानकावर थांबा देण्याची आग्रही मागणी केली होती. चंद्रपूर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक व व्यावसायिक केंद्र असल्याने येथे राजधानी एक्सप्रेसला थांबा मिळणे अत्यंत गरजेचे आहे, ही बाब त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
या पत्राची दखल घेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २९ जुलै २०२६ रोजी खासदार धानोरकर यांना दिलेल्या अधिकृत पत्रात स्पष्ट केले आहे की, खासदार महोदयांनी उपस्थित केलेल्या चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील राजधानी एक्सप्रेसच्या थांब्याबाबत आणि इतर संबंधित विषयांची चौकशी सुरू करण्यात आली असून तपासणीनंतर योग्य ती आवश्यक कारवाई केली जाईल. चंद्रपूरच्या नागरिकांसाठी आणि रेल्वे प्रवाशांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.



