“रुंदीकरणाच्या नावाखाली रस्ता अरुंद, अपघाताची वाट पाहताय का?”- खुशाल लोडे
ST चालकाची लेखी नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजवा कालव्यावरील सायखेडा पालेबारसा शाखा कालवा क्र. 5 आणि उसरपार चक पालेबारसा वरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम म्हणजे “नावाला रुंदीकरण, प्रत्यक्षात अपघाताला आमंत्रण” झाल्याचा गंभीर आरोप विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी संचालक खुशाल लोडे यांनी केला आहे.
करोडो रुपये खर्च करून मुरूम टाकून रस्ता रुंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कंत्राटदाराने स्टील क्रॅश बॅरियर डांबरी रस्त्याच्या काठालगतच ठोकले. त्यामुळे डांबरीकरण फक्त 3 मीटरपेक्षा कमी राहिले आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या मोठ्या गाड्या, ट्रक, एसटी बस, मोटारसायकल, बैलबंडी यांना एकमेकीला साईड देणे जवळपास अशक्य झाले आहे. एका बाजूला कालव्याचा खोल काठ असल्याने चालकाची थोडीशी जरी चूक झाली तरी गाडी थेट पाण्यात जाण्याचा धोका आहे.
*ST चालकाची लेखी नोंद, प्रशासनाला धोक्याची जाणीव*
या धोकादायक रस्त्याबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या MH40 N 9330 क्रमांकाच्या बसच्या चालकाने दि. 13 JUN 2026 रोजी रोजनामा क्र. 0917764 मध्ये स्पष्ट नोंद केली आहे:
“उसरपार चक, पालेबारसा, सायखेडा गोसेखुर्द पुलावर रस्त्याचे काम झाले. बाजूला लोखंडी राड लावले आहे. बस जातांना बाजूला जागा उरत नाही. सुरक्षेचा प्रश्न आहे. परतीत झाल्यास अपघात होण्याचा संभव नाकारता येत नाही”.
चालकाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रशासनाला धोक्याची कल्पना दिली, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
*खुशाल लोडे यांचा संतप्त सवाल*
अध्यक्ष खुशाल लोडे म्हणतात, “रुंदीकरणाच्या नावाखाली मुरूम टाकून मोकळी जागा वाढवली होती. पण कंत्राटदाराने स्टील अँगल रस्त्याच्या काठालगत लावून ती जागा अडवली. डांबरी रस्ता 3 मीटरपेक्षा कमी झाला आहे. कालवा काठ असल्याने येथे अपघात झाला तर जबाबदारी कोण घेणार?
ST चालकाने लेखी नोंद करून दिली तरी गोसेखुर्द विभागाचे अधिकारी झोपा काढत आहेत. प्रवाशांचे जीव धोक्यात टाकून हे काम चालू आहे. आम्ही तातडीने क्रॅश बॅरियर किमान 5 मीटर आत हलवून, 7 मीटर डांबरीकरण + 1.5 मीटर खडीचा शोल्डर करावा अशी मागणी करतो. अन्यथा शेकडो ग्रामस्थांसोबत तीव्र आंदोलन छेडू.” असा ईशारा अध्यक्ष तथा माजी संचालक खुशाल लोडे यांनी गोसी खुर्द प्रशासणाला दिला आहे.
*ग्रामस्थ आक्रमक, निवेदन सादर*
खुशाल लोडे यांच्या नेतृत्वाखाली सायखेडा, पालेबारसा, उसरपार चक परिसरातील ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द विभाग यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यासोबत ST बस चालकाचा रोजनामा क्र. 0917764, दि. 13/06/2026 ची प्रत जोडण्यात आली आहे.
फोटोमध्ये दिसते तशी लाल रंगाची MH40 N 9330 बस जेमतेम रस्त्यावरून जात आहे. दोन्ही बाजूला लोखंडी बॅरियर आणि मागे कालव्याचा काठ – हे दृश्यच सर्व काही सांगते.
रुंदीकरणासाठी खर्च झालेला पैसा आणि नागरिकांच्या सुरक्षेत तफावत दिसत असल्याने परिसरात संतापाची लाट आहे. प्रशासन लवकर निर्णय घेते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे असे अध्यक्ष खुशाल लोडे यांनी म्हटले आहे.



